Warora Crime News वरोरा पंचायत समितीत अधिकाऱ्याला धमकी देणाऱ्यावर गुन्हा

‘मी राजा आहे!’ दारूच्या नशेत ग्रामसेवकाचा कार्यालयात राडा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 18, 2026

वरोरा (चंद्रपूर): Warora Crime News: शासकीय सेवेत असताना कर्तव्याचे भान विसरून दारूच्या नशेत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दालनात घुसून अरेरावी करणाऱ्या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल झाला आहे. वरोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन मारोतीराव मुंडकर यांच्या दालनात हा धक्कादायक प्रकार घडला. चिमूर पंचायत समितीअंतर्गत कार्यरत ग्रामसेवक विवेक तितरे याने बीडीओंना अश्लील शिवीगाळ करत अ‍ॅट्रॉसिटीची खोटी तक्रार करण्याची धमकी दिली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हे हि वाचा – राजुऱ्यातील बुलेट आणि वर्ध्यातील चोर, पोलिसांनी केला उलगडा)

वरोरा पंचायत समितीत दुपारी घडला धक्कादायक प्रकार

शासकीय सेवेत असताना कर्तव्याचे भान विसरून चक्क दारूच्या नशेत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दालनात घुसून अरेरावी करणे, अश्लील शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि थेट अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी देणे एका ग्रामसेवकाला चांगलेच महागात पडले आहे. वरोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) गजानन मारोतीराव मुंडकर यांच्या दालनात घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर वरोरा पोलिसांनी चिमूर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या विवेक तितरे नामक ग्रामसेवकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Warora Crime News : ‘मी राजा आहे’ म्हणत अधिकाऱ्याला शिवीगाळ

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, वरोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन मारोतीराव मुंडकर (वय ३३) हे १७ सप्टेंबर रोजी दुपारी कार्यालयातील आपल्या दालनात दैनंदिन प्रशासकीय कामकाज सांभाळत उपस्थित होते. दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास एक व्यक्ती अचानक मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या दालनात शिरली आणि कोणत्याही कारणाशिवाय मोठ्या आवाजात आरडाओरड करू लागली. कार्यालयातील परिचर ज्योती धोंगडे यांनी संबंधित व्यक्तीला समजावून शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र नशेत असलेल्या या व्यक्तीचा आरडाओरड सुरूच होता. परिस्थितीचे गांभीर्य पाहून गटविकास अधिकारी मुंडकर यांनी त्यास ‘काय प्रकरण आहे आणि आपण कोण?’ अशी विचारणा केली. त्यावर त्याने स्वतःचे नाव विवेक तितरे असल्याचे सांगत आपण चिमूर पंचायत समिती येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले. त्यावेळी कार्यालयात उपस्थित असलेले प्रणव बक्षी यांनी सदर व्यक्ती आपला बॅचमेट असल्याचे ओळखून अधिकाऱ्यांना माहिती दिली.

यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी ‘तुम्ही कार्यालयात सुट्टी घेऊन आला आहात का?’ असा प्रशासकीय प्रश्न विचारला असता, मद्यधुंद विवेक तितरे याचा पारा अधिकच चढला. त्याने थेट उद्धटपणे “मी राजा आहे, मला सुट्टीची गरज नाही, मला कोणी विचारत नाही, मी तुम्हाला बांधील नाही आणि मी इथला कर्मचारीही नाही,” असा उद्दाम पवित्रा घेत गोंधळ सुरू ठेवला. त्यावर मुंडकर यांनी ‘तुम्ही स्वतः शासकीय कर्मचारी आहात, दारू पिऊन अशा प्रकारे शासकीय कार्यालयात येणे योग्य नाही,’ अशी समज दिली. यामुळे विवेक तितरे प्रचंड संतापला आणि त्याने काहीही ऐकून न घेता खुर्चीवरून उठून गटविकास अधिकाऱ्यांना उद्देशून अत्यंत घाणेरड्या आणि अश्लील भाषेत शिवीगाळ सुरू केली. एवढ्यावरच न थांबता ‘तू मला विचारणारा कोण, तुला बघून घेतो, तुझ्यावर अ‍ॅट्रॉसिटी लावीन’ अशी थेट धमकी देऊन त्याने कार्यालयातील शासकीय कामात थेट अडथळा निर्माण केला.

भारतीय न्याय संहितेनुसार विवेक तितरेवर विविध कलमान्वये गुन्हा

कार्यालयातील वाढता गोंधळ पाहून गटविकास अधिकाऱ्यांनी तत्काळ वरोरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांना फोन लावल्याचे लक्षात येताच तितरे आरडाओरड करत तिथून पसार झाला. या घटनेनंतर गटविकास अधिकारी गजानन मुंडकर यांनी तात्काळ वरोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तोंडी तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून वरोरा पोलिसांनी आरोपी विवेक तितरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम २२१ (शासकीय कामात अडथळा), कलम २९६ (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य/शिवीगाळ) आणि कलम ३५१(२) (धमकी देणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणे प्रभारी निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गौरकार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भरदिवसा शासकीय कार्यालयात मद्यधुंद कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यालाच दिलेल्या या धमकीच्या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment