चंद्रपूर (भद्रावती ): bhadrawati crime news समोर आली असून घोडपेठ येथील गारवा हॉटेलमध्ये वाद झाला आहे. महिला ग्राहकांसमोर अश्लील बोलण्यास मनाई केल्याने वेटरला धमकी देण्यात आली.
या प्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. (हे हि वाचा – मारहाणीच्या घटनेमुळे उघडकीस आलं भयावह कांड)
भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथील गारवा हॉटेलमध्ये महिला ग्राहकांसमोर अश्लील भाषेत बोलण्यास मनाई केल्याच्या कारणावरून हॉटेलमधील वेटरला अश्लील शिवीगाळ करत मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महिलांसमोर अश्लीलता रोखल्याने वाद
घोडपेठ येथील रहिवासी मिलिंद सुधाकरराव चौधरी (वय ३४) हे सुधीर राऊत यांच्या मालकीच्या गारवा हॉटेलमध्ये वेटर व काउंटर सांभाळण्याचे काम करतात. मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास शिवम मधुकर वऱ्हाडे आणि गोलू शासनकर (दोन्ही रा. घोडपेठ) हे दोघे हॉटेलमध्ये आले. त्यांनी खाण्याची ऑर्डर दिली. दरम्यान, दोघेही दारूच्या नशेत एकमेकांशी अत्यंत अश्लील भाषेत बोलत होते. हॉटेलमध्ये शेजारीच महिला ग्राहक बसलेल्या असल्याने मिलिंद चौधरी यांनी त्यांना महिलांची उपस्थिती लक्षात आणून देत अश्लील भाषा न वापरण्याची विनंती केली.
पत्नी पीएसआय असल्याची बतावणी करत शिवीगाळ
याचा राग आल्याने बिल देऊन बाहेर पडताना शिवम वऱ्हाडे याने मिलिंद यांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आई-बहिणीवरून शिवीगाळ केली. तसेच “माझी पत्नी पीएसआय आहे, तुला जीवाने ठार मारतो आणि पाहून घेतो,” अशी धमकी देत तो मिलिंद यांच्या अंगावर धावून गेला. मिलिंद यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याला धक्का दिला असता, तो दारूच्या नशेत हॉटेलच्या शेडमधील लोखंडी अँगलवर आदळला आणि त्याच्या डोक्याला दुखापत होऊन रक्त निघाले. घटनेची माहिती मिळताच हॉटेल मालक सुधीर राऊत व त्यांच्या पत्नीने तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला समजावून स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले.
त्यानंतर काही वेळातच शिवमची आई विद्या मधुकर वऱ्हाडे हिने हॉटेलवर येत मालकीण उज्वला राऊत यांच्यासमोर वेटर मिलिंद यांना अश्लील शिवीगाळ केली व बाहेर काढून मारण्याची धमकी दिली. तसेच गोलू शासनकर यानेही शिवीगाळ व धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या सततच्या धमक्यांमुळे निर्माण झालेल्या भीतीपोटी मिलिंद चौधरी यांनी भद्रावती पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
तक्रारीच्या आधारे भद्रावती पोलिसांनी आरोपी शिवम मधुकर वऱ्हाडे, गोलू शासनकर आणि विद्या मधुकर वऱ्हाडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम २९६, ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार प्रकाश खाडे करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






