वरोरा (चंद्रपूर): Warora Theft Case संदर्भात वरोरा शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंबेडकर चौक परिसरातील HDFC बँक पार्किंगमधून स्कॉर्पिओची काच फोडून अडीच लाखांची रोकड चोरीला गेली.
प्लॉट विक्री करून धनादेश जमा करण्यासाठी आलेल्या एका व्यावसायिकाच्या गाडीवर हा डल्ला मारण्यात आला. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. (हे हि वाचा – माझी पत्नी पीएसआय तुला बघून घेतो, वेटरला मारहाण करीत धमकी)
शहरातील अत्यंत वर्दळीच्या आंबेडकर चौक परिसरातील एचडीएफसी बँक पार्किंगमधून एका व्यावसायिकाच्या कारची काच फोडून अज्ञात चोराने अडीच लाख रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग लंपास केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली. या धाडसी चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्लॉट विक्रीचा व्यवहार आणि रोख अडीच लाखांची रक्कम
मिळालेल्या माहितीनुसार, माजरी कॉलरी येथील रहिवासी असलेले ३० वर्षीय प्लॉट व्यावसायिक निलेश नथ्थुजी भेले हे २० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी प्लॉट विक्रीच्या व्यवहाराच्या नोंदणीसाठी वरोरा येथील रजिस्टर ऑफिसमध्ये गेले होते. तेथे त्यांनी अशोक कुळसंगे यांना आपल्या एका प्लॉटची अधिकृत विक्री केली. या व्यवहारापोटी कुळसंगे यांनी भेले यांना २ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश (चेक) आणि ५०० रुपयांच्या नोटांच्या पाच बंडलांच्या स्वरूपात २ लाख ५० हजार रुपयांची रोकड दिली. निलेश भेले यांनी ही सर्व रोकड, धनादेश आणि स्वतःची जात वैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडिटी), अधिवास दाखला (डोमेसाइल), बोनाफाइड यांसारखी महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रे आपल्या काळ्या रंगाच्या कॉलेज बॅगमध्ये सुरक्षित ठेवली.
दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास भेले हे आपल्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनाने (क्रमांक MH-34-AM-8276) मिळालेला धनादेश जमा करण्यासाठी आंबेडकर चौकातील एचडीएफसी बँकेत पोहोचले. त्यांनी आपली गाडी बँकेच्या पार्किंगमध्ये रीतसर लॉक करून लावली आणि ते बँकेच्या आत गेले. केवळ पंधरा मिनिटांत, म्हणजेच दुपारी चार वाजता धनादेश जमा करून ते पार्किंगमध्ये परतले असता, गाडीच्या चालक बाजूच्या दरवाजाची काच फुटलेली असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तातडीने गाडी उघडून पाहिले असता आतील रोख अडीच लाखांची रक्कम व कागदपत्रे असलेली बॅग गायब झाल्याचे निदर्शनास आले.
रजिस्टर ऑफिसमधून निघताना दोन अज्ञात तरुण आपल्या हालचालींवर पाळत ठेवून असल्याचा संशय फिर्यादी निलेश भेले यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी निलेश भेले यांच्या तोंडी तक्रारीवरून वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०५ अन्वये चोरीचा गुन्हा (अपराध क्र. ०९०९/२०२६) दाखल करण्यात आला आहे. ठाणे प्रभारी निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय भाऊराव गौरकार या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, पोलीस परिसरातील आणि बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






