चंद्रपूर – (Car Glass Breaking Theft) चंद्रपूर शहरातील संत केवरराम चौक परिसरात कारची काच फोडून २५ हजार रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑईल लीक झाल्याचे सांगून युवकाचे लक्ष विचलित करण्यात आले आणि त्याच संधीचा फायदा घेत चोरट्याने चोरी केली.
२३ जून २०२६ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील रामनगर पोलीस ठाण्यात एक चोरीची तक्रार नोंदवण्यात आली आहे. याप्रकरणी फिर्यादी राजेश जगदीश दुदानी (वय ५२ वर्षे, रा. हरिओम लेआउट, वडगाव, चंद्रपूर) यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०५(बी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (कार चा काच फोडला, ४ लाख लंपास)
Car Glass Breaking Theft प्रकरण नेमके कसे घडले?
फिर्यादी राजेश दुदानी यांचे गंजवार्ड येथे धान्याचे दुकान असून संत कंवरराम चौक येथे ‘ओंकार मेडिकल’ आणि ‘एस. फार्मा होलसेल मेडिकल स्टोअर’ आहे. २३ जून २०२६ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास राजेश दुदानी हे आपले धान्याचे दुकान बंद करून त्यांचा १९ वर्षांचा लहान मुलगा समर्थ याच्यासह ग्रँड विटारा कारने (क्र. एम.एच.३४ सी.जे. ४८९३) केवळराम चौकातील ओंकार मेडिकलसमोर आले. कार रस्त्याच्या कडेला पार्क केल्यानंतर मुलगा समर्थ ड्रायव्हिंग सीटवरच बसून होता, तर राजेश दुदानी कारमधून उतरून नेहमीप्रमाणे आपल्या मेडिकल दुकानात जाऊन बसले.
समर्थ कारमध्ये एकटाच बसलेला असताना एक अज्ञात दुचाकीस्वार तिथे आला. कारची काच बंद असल्याने समर्थने कारचा दरवाजा उघडला, तेव्हा त्या अज्ञात व्यक्तीने ‘तुमच्या गाडीचे ऑईल समोरून लीक होत आहे’ असे सांगितले. हे ऐकून समर्थ ऑईल लीक झाले की नाही हे पाहण्यासाठी गाडीखाली उतरला आणि गाडीच्या समोर जाऊन पाहू लागला. मात्र रस्त्यावर पावसाचे पाणी असल्याने त्याला काही समजले नाही, म्हणून त्याने गाडी लॉक केली आणि तो समोरील एस. फार्मा होलसेल मेडिकलमध्ये जाऊन बसला.
काही वेळाने राजेश दुदानी आणि त्यांचा मुलगा समर्थ घरी जाण्यासाठी पुन्हा कारजवळ आले. राजेश दुदानी हे नेहमी कारच्या मागील सीटवर पैशांची पिशवी ठेवायचे. कारमध्ये बसल्यानंतर त्यांनी समर्थला मागील सीटवर ठेवलेली पैशांची पिशवी पाहण्यास सांगितली. समर्थने मागे पाहिले असता त्याला पैशांची पिशवी दिसली नाही आणि कारच्या मागील डाव्या बाजूची काच तुटलेली असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. दोघांनी कारमध्ये सर्वत्र शोध घेतला, परंतु पिशवी मिळून आली नाही.
समर्थला ऑईल लीक झाल्याचे खोटे सांगून त्याचे लक्ष विचलित करण्यात आले होते आणि त्याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोराने कारची काच फोडून आत ठेवलेली पैशांची थैली चोरून नेली. या पिशवीमध्ये हिशोबाची महत्त्वाची कागदपत्रे आणि २५,००० रुपये नगदी रक्कम होती. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी इन्स्पेक्टर प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्ण प्रल्हाद दराडे यांच्याकडे पुढील तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






