JCB Finance Fraud case registered at Chimur Police Station

चिमूरमध्ये जेसीबी फायनान्सच्या नावाखाली 3.54 लाखांची फसवणूक; बनावट कर्ज मंजुरी पत्राचा धक्कादायक प्रकार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 24, 2026

चंद्रपूर – (JCB Finance Fraud) चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे जेसीबी खरेदीसाठी फायनान्स मंजूर करून देण्याच्या बहाण्याने 3 लाख 54 हजार 507 रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. बनावट कर्ज मंजुरी पत्र पाठवून आरोपीने फिर्यादीची ऑनलाइन फसवणूक केली. (गाडीचे ऑइल लीक झाले बघा, २५ हजार लंपास)

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ब्याको लोडर (जेसीबी) खरेदीसाठी फायनान्स मंजूर करून देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची ३ लाख ५४ हजार ५०७ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फिर्यादी विवेक रामचंद्र कापसे (वय ५५ वर्षे, रा. नवेगाव पेठ, चिमूर) यांनी २२ जून २०२६ रोजी चिमूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तोंडी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) अधिनियम, २००० चे कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

JCB Finance Fraud प्रकरण नेमके काय आहे?

या घटनेची सविस्तर हकीकत अशी की, फिर्यादी विवेक कापसे हे शेती व्यवसायासोबतच जेसीबी किरायाने देण्याचे काम करतात. त्यांना नवीन ‘प्रीत कंपनीचा ब्याको लोडर’ खरेदी करायचा असल्याने त्यांनी २ मे २०२६ रोजी एम.एस.सी. मोटर्स (प्रीत कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकृत डीलर) यांच्याशी संपर्क साधून शोरूममध्ये जाऊन गाडीची किंमत विचारली. डीलरने सदर जेसीबीची किंमत ३२ लाख रुपये सांगितली. मात्र, एवढी मोठी रक्कम नसल्याने कापसे यांनी फायनान्ससाठी चौकशी केली असता, डीलरने त्यांना ‘पुनावाला क्रॉप फायनान्स’ कंपनीचा एक मोबाईल क्रमांक दिला.

कापसे यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला असता समोरच्या व्यक्तीने आपले नाव हेमंत जोशी असल्याचे सांगितले आणि लोन प्रक्रियेसाठी काही कागदपत्रे व्हाट्सअपवर मागवून घेतली. त्यानंतर काही वेळाने आरोपीने कापसे यांना २९ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगून खोटे लोन मंजुरी पत्र व्हाट्सअपवर पाठवले. तसेच मार्जिन मनी म्हणजेच डाऊन पेमेंट म्हणून ३ लाख ५४ हजार ५०७ रुपये ‘वृषभ इखार’ या नावावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात जमा करण्यास सांगितले.

आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून विवेक कापसे यांनी १८ मे २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास त्यांच्या पत्नी सौ. पायल कापसे यांच्या बँक खात्यावरून आरोपीने दिलेल्या बँक खात्यात एकूण ३,५४,५०७ रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. रक्कम जमा केल्यानंतर शोरूममध्ये ‘डी.ओ. लेटर’ देण्यासाठी कापसे यांनी पुन्हा हेमंत जोशी नावाच्या त्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा मोबाईल क्रमांक बंद दाखवू लागला. १९ मे २०२६ पासून सतत फोन बंद असल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे कापसे यांच्या लक्षात आले.

दरम्यान, अशाच पद्धतीने चंद्रपूर येथील सचिन चंदनबावणे यांचीही आर्थिक फसवणूक झाली असून त्यांनी यापूर्वीच चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून संबंधित आरोपीला अटक केली असून तो पोलीस कोठडीत (PCR) असल्याची माहिती कापसे यांना मिळाली. तपासात समोर आले की, अटक करण्यात आलेल्या या भामट्याने अनेक खोट्या नावांचा वापर करून लोकांची फसवणूक केली असून त्याचे खरे नाव विनोद शांताराम गडाख पाटील (वय ४४ वर्षे, रा. फ्लॅट नं. ११०३, लक्झर को-ऑपरेटिव्ह सोसायटी, मोहन नगर, बाणेर, ता. हवेली, जि. पुणे) असे आहे. या माहितीच्या आधारे विवेक कापसे यांनी चिमूर पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार नोंदवली असून, चिमूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश त्र्यंबक लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment