चंद्रपूर : Rahul Gandhi Chatron Ki Goonj हा विशेष संवाद कार्यक्रम पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन होत आहे.
या कार्यक्रमात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी विद्यार्थिनींशी थेट संवाद साधतील. चंद्रपुरातील विविध महाविद्यालयांमधून २०० हून अधिक विद्यार्थिनींनी यासाठी नोंदणी केली आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरात महिलांची पुरुषांच्या मक्तेदारीला मात)
माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २२ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे ‘छात्रों की गूंज’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे प्रामुख्याने विद्यार्थिनींशी म्हणजेच ‘सावित्रीच्या लेकीं’शी थेट संवाद साधणार आहेत. या परिषदेत शिक्षण, महिलांची सुरक्षा, परीक्षांमधील पेपरफुटीचे प्रकार, बेरोजगारी तसेच स्पर्धा परीक्षांमधील विविध अडचणी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि ज्वलंत मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ. चंदाताई मनोजराव वैरागडे यांनी शहरातील विविध महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. यामध्ये एफ.ई.एस. कॉलेज (चंद्रपूर), स्व. गोपाळराव वानखेडे कनिष्ठ महाविद्यालय (नांदगाव पोडे), डॉ. झाडे नर्सिंग कॉलेज (आरवट) आणि राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज (चंद्रपूर) या प्रमुख शिक्षण संस्थांचा समावेश होता. या वेळी चंदाताई वैरागडे यांनी विद्यार्थिनींना तसेच त्यांच्या कुटुंबीय व नातेवाईकांमधील युवतींना ‘सावित्रीच्या लेकींचा आवाज बुलंद करण्यासाठी’ या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
या आवाहनाला विद्यार्थिनींनी अत्यंत सकारात्मक व उत्स्फूर्त प्रतिसाद देत क्यूआर (QR) कोड व लिंकच्या माध्यमातून तत्काळ नोंदणी केली. एकाच दिवसात तब्बल २०० हून अधिक विद्यार्थिनींनी या कार्यक्रमासाठी आपली नोंदणी पूर्ण केली. या महाविद्यालयीन संपर्क मोहिमेदरम्यान चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवा राव यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आणि विद्यार्थिनींशी संवाद घडवून आणण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांचे व व्यवस्थापनाचे सौ. चंदाताई वैरागडे यांनी मनःपूर्वक आभार मानले.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






