चंद्रपूर: Khelo India Samvaad Chandrapur कार्यक्रमांतर्गत सरदार पटेल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट आभासी संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गोंडवाना विद्यापीठ आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रतिष्ठित कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या अब्दुल शफी सभागृहात गुरुवारी पार पडणार आहे. (हे हि वाचा – गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करा – प्रतिभा धानोरकर)
राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ च्या औचित्याने केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या ‘माय भारत’ (MY Bharat) उपक्रमांतर्गत देशभरात ‘खेलो इंडिया संवाद – खेळ की बात पीएम के साथ’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) प्रादेशिक संचालनालय (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे. हा कार्यक्रम गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी महाविद्यालयाच्या ‘अब्दुल शफी सभागृहात’ संपन्न होणार आहे.
Khelo India Samvaad Chandrapur उपक्रमाची रूपरेषा आणि महत्त्व
या देशव्यापी उपक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांशी आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने थेट संवाद साधणार असून, देशातील क्रीडा परिसंस्थेचा विकास आणि तंदुरुस्त भारताची संकल्पना मांडणार आहेत.
संवादाचे मुख्य विषय व उद्दिष्टे: पंतप्रधानांच्या राष्ट्रीय भाषणानंतर स्थानिक पातळीवर स्थानिक खेळाडू, लोकप्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांमध्ये ‘युवा संवाद’ चर्चासत्र पार पडेल. यामध्ये खालील चार प्रमुख संकल्पनांवर मंथन होणार आहे:
१. क्रीडा परिसंस्थेचा विकास: तालुका व जिल्हा पातळीवर खेळाची मैदाने, आधुनिक क्रीडा सुविधा, प्रशिक्षक, पोषण आणि खेळाडूंचे पुनर्वसन.
२. २०३६ ऑलिम्पिकसाठी प्रतिभा विकास: ‘मिशन २०३६ ऑलिम्पिक’साठी प्राथमिक पातळीवरून खेळाडूंची निवड व त्यांना दीर्घकालीन प्रशिक्षण.
३. क्रीडातून युवा नेतृत्व व प्रशासन: खेळाच्या माध्यमातून तरुणांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण व राष्ट्रसेवेची भावना विकसित करणे.
४. विकसित भारतासाठी युवक सक्षमीकरण: ‘विकसित भारत @२०४७’ च्या उद्दिष्टपूर्तीसाठी युवकांना कौशल्यपूर्ण बनवणे आणि ‘माय भारत’ व्यासपीठाशी जोडणे.
कार्यक्रमादरम्यान सहभागी विद्यार्थ्यांना ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करण्याची आणि आपले विचार क्यूआर कोडद्वारे डिजिटल स्वरूपात मांडण्याची संधी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हर्च्युअली जोडले जाणे आणि क्रीडा क्षेत्रातील भविष्यावर आपले मत मांडणे ही विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी असून, सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी केले असून त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली कि महाविद्यालयातील २०० विद्यार्थी या संवाद कार्यक्रमात सहभागी होतील मात्र तत्पूर्वी नोंदणी करणे गरजेचे आहे. या दरम्यान संवाद कार्यक्रम सलग सुरु रहावा याचे नियोजन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






