Ballarpur Illegal Diesel Seized - बल्लारपूर पोलिसांची कळमना गावात डिझेल साठ्यावर मोठी कारवाई

चंद्रपुरात डिझेल माफियांचा डाव उधळला; दोघांना बेड्या

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 26, 2026

चंद्रपूर / बल्लारपूर: Ballarpur Illegal Diesel Seized प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कळमना गावात अवैध डिझेल साठवणुकीचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून १,१२० लिटर डिझेल जप्त केले. यासोबतच गुन्ह्यात वापरलेले बोलेरो पिकअप वाहनही ताब्यात घेतले आहे. जप्त केलेल्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत ११ लाख ९ हजार ७६० रुपये आहे. या कारवाईमुळे परिसरातील डिझेल माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. (हे हि वाचा – शिक्षिकेचा मुख्याध्यापकांवर हल्ला)

Ballarpur Illegal Diesel Seized : कळमना गावात पोलिसांची धडक कारवाई

बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमना गावात अवैध डिझेलची साठवणूक आणि चोरटी विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मंगळवारी दुपारी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तब्बल १ हजार १२० लिटर अवैध डिझेल आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे बोलेरो पिकअप वाहन असा एकूण ११ लाख ९ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी दोन तरुणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल दुधराम राऊत हे पोलीस अंमलदार भास्कर चिंचवलकर आणि सचिन राठोड यांच्यासह हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली. कळमना गावातील भाऊराव थेरे यांच्या राहत्या घरी भाड्याने राहणारे दोन इसम बेकायदेशीररीत्या डिझेलचा मोठा साठा करून त्याची चोरट्या मार्गाने विक्री करत असून, या डिझेलच्या वाहतुकीसाठी बोलेरो पिकअप वाहनाचा वापर केला जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीची तत्काळ दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांनी पोलीस निरीक्षकांमार्फत राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात अवगत केले आणि कारवाईचे रीतसर आदेश प्राप्त केले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ पंचांना सोबत घेत कळमना येथील भाऊराव थेरे यांच्या घराची घेराबंदी केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या राहुल श्रावण जुवारे (वय २५, रा. शिवाजी वार्ड, बल्लारपूर) आणि त्याचा साथीदार प्रतिक पांडुरंग क्षीरसागर (वय २४, रा. घोनाळ, ता. भद्रावती) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

३२ कॅनमध्ये १,१२० लिटर अवैध डिझेल जप्त

पोलिसांनी घटनास्थळी उभ्या असलेल्या बोलेरो पिकअप वाहनाची (क्रमांक एम.एच. ३४ बी.झेड. १७६०) पंचांसमक्ष कसून तपासणी केली असता, वाहनात काळ्या रंगाचे ३२ प्लास्टिक कॅन आढळून आले. या प्रत्येक कॅनमध्ये अंदाजे ३५ लिटरप्रमाणे एकूण १ हजार १२० लिटर डिझेल भरलेले मिळून आले. बाजारातील प्रति लिटर ९८ रुपये दराप्रमाणे या डिझेलची किंमत १ लाख ९ हजार ७६० रुपये आणि वाहतुकीसाठी वापरलेले १० लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन, असा एकूण ११ लाख ९ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी पंचनामा करून जप्त केला. रासायनिक विश्लेषणासाठी (C.A. Sample) तीन स्वतंत्र काचेच्या बाटल्यांमध्ये नमुने घेऊन ते सीलबंद करण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयितांकडे डिझेलच्या मालकी हक्काबाबत, खरेदी-विक्रीच्या परवान्याबाबत अथवा वाहतुकीच्या अधिकृत कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि कोणतीही वैध कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे हा साठा चोरीचा असून विनापरवाना काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या फिर्यादीवरून आरोपी राहुल जुवारे आणि प्रतिक क्षीरसागर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०३(२), ३(५) तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ व ७ अन्वये बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस निरीक्षक शब्बीर खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, हे डिझेल नेमके कुठून चोरून आणले होते आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment