चंद्रपूर – (Chandrapur Thai Magur Fish) प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रामनगर पोलिसांनी बंगाली कॅम्प परिसरात धाड टाकून 600 किलो प्रतिबंधित थाई मांगूर मासे जप्त केले. या कारवाईत 7.60 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आंध्रप्रदेशातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून BNS आणि अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (घरात छापा, ५ किलो गांजा जप्त)
चंद्रपूर येथील रामनगर पोलिसांनी मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि केंद्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या ‘थाई मांगूर’ माशांची बेकायदेशीर वाहतूक व विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने बंगाली कॅम्प परिसरातील मच्छी मार्केटमध्ये धाड टाकून तब्बल ६०० किलो प्रतिबंधित मासे आणि एक बोलेरो पिकअप वाहन असा एकूण ७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आंध्रप्रदेशातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chandrapur Thai Magur Fish प्रकरण नेमके काय?
मिळालेल्या माहितीनुसार, २२ जून २०२६ रोजी दुपारी २:०० वाजताच्या सुमारास रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे हे पोलीस हवालदार शरद कुडे यांच्यासह परिसरात पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, त्यांना एका खात्रीशीर बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की, बंगाली कॅम्प येथील मच्छी मार्केट भागात केंद्र शासनाने प्रतिबंधित केलेला ‘थाई मांगूर’ जातीचा मासा एका महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनातून विक्रीसाठी आणण्यात आला आहे. या माहितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने याची कल्पना रामनगरच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांना दिली आणि त्यांच्या आदेशानुसार पोलीस पथकाने बंगाली कॅम्प परिसर गाठून संशयास्पद वाहन आणि त्यातील माशांचा साठा ताब्यात घेतला. (श्वान पथकासह पोलिसांची गांजा शोध मोहीम)
यानंतर पोलिसांनी मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांना पाचारण करून सदर माशांची तांत्रिक तपासणी केली असता, हा साठा मानवी आरोग्याला कमालीचा घातक असलेल्या प्रतिबंधित ‘थाई मांगूर’ जातीच्या माशांचाच असल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकीय दृष्ट्या या माशाचे सेवन केल्यास कॅन्सर (कर्करोग) सारखा जीवघेणा आजार बळावण्याची दाट शक्यता असते आणि तो मानवी जीवितास पूर्णपणे हानिकारक असल्याने केंद्र सरकारने त्याच्या विक्री व पालनावर पूर्ण बंदी घातली आहे.
माशांची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी या बेकायदेशीर विक्री प्रकरणी आरोपी व्येंकटेश्वरराव पिथीराव घंटासाला (रा. डी एन ओ ४-७६ ए, प्रथिकोल्लांका, जि. ईलूरु, राज्य- आंध्रप्रदेश) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी कारवाईदरम्यान ६०,००० रुपये किमतीचे सुमारे ६०० किलो थाई मांगूर मासे आणि वाहतुकीसाठी वापरलेले ७ लाख रुपये किमतीचे महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन (क्रमांक TS 06 UB 6538) असा एकूण ७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात अप क्र. ८५४/२०२६, कलम २२३, २७२, २७५ भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ सहकलम अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम ५९ (आय) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर धडक कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगरच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे, डिबी स्टाफचे पोलीस हवालदार शरद कुडे, आनंद खरात, जितेंद्र आकरे, बाबा नैताम आणि पोलीस अंमलदार प्रकाश मडावी व संपूर्ण डिबी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






