चंद्रपूर: Chandrapur Illegal Weapons Seized मोहिमेअंतर्गत चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे. ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर शहर परिसरात पोलिसांनी स्वतंत्र छापे टाकले. या कारवाईत एका घरातून गावठी भरमार बंदूक आणि दुसऱ्या ठिकाणाहून घातक चाकू जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींवर भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे नोंदवले आहेत. (हे हि वाचा – मामा म्हणून आला आणि अल्पवयीन मुलीसोबत नको ते केलं..)
Chandrapur Illegal Weapons Seized: पोलिसांचा बेकायदेशीर शस्त्रांवर दणका
चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम राबवत चंद्रपूर शहर आणि ब्रह्मपुरी परिसरात दोन स्वतंत्र कारवायांमध्ये गावठी भरमार बंदूक आणि एक धारदार चाकू जप्त केला असून दोन जणांवर भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे नोंदवले आहेत.
पहिली कारवाई ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा हळदा येथे करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक रेखलाल गौतम हे सहकाऱ्यांसह रात्रगस्त आणि पेट्रोलिंगवर असताना हळदा येथील राकेश हरीदास देशमुख (वय ३५) हा स्वतःच्या घरात विनापरवाना अग्निशस्त्र बाळगून असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचांसह तात्काळ संशयिताच्या घरावर छापा टाकला.
ब्रह्मपुरीतील हळदा गावात धाड: गावठी भरमार बंदूक जप्त
घराची सखोल झडती घेतली असता एका खोलीतील सामानाच्या खाली लपवून ठेवलेली सुमारे ११ हजार रुपये किमतीची, १३४ सेमी लांबीची जुनी गावठी लोखंडी-लाकडी भरमार बंदूक आढळून आली. या शस्त्राबाबत कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी भरमार बंदूक जप्त करून आरोपी राकेश देशमुखविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चांगोले करीत आहेत.
दुसरी कारवाई चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. आकाशवाणी रोडवरील रामलखन अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ११ मध्ये राहणारा संतोष उर्फ विक्की भास्कर दुसाने (वय ३४) याने घरात धोकादायक लोखंडी चाकू बाळगल्याची माहिती समोर आली. माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जितेंद्र आकरे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचांसमक्ष घराची तपासणी केली असता हॉलमधील बेडच्या गादीखाली लपवलेला ४१ सेमी लांबीचा, स्टीलची मुठ असलेला आणि धारदार पात्यावर १४ खाचा असलेला घातक लोखंडी चाकू मिळून आला.
पोलिसांनी सदर चाकू जप्त करून आरोपी संतोष दुसानेविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे करीत आहेत. चंद्रपूर शहर व ग्रामीण भागात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी घेतलेल्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






