चंद्रपूर: Chandrapur POCSO Court Verdict अंतर्गत चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आणि कठोर निकाल दिला आहे. एका अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृत आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या गुन्ह्यासाठी आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. पी. एम. गुप्ता यांनी हा निकाल जाहीर केला. (हे हि वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील २ दारूविक्रेते तडीपार)
Chandrapur POCSO Court Verdict: न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा
अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका विकृत आरोपीला चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत १० वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची कठोर शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त १ महिन्याचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. याशिवाय, धमकी दिल्याप्रकरणी भादंवि कलम ५०६(II) अन्वये २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली आहे. या खटल्याचा महत्त्वपूर्ण निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. पी. एम. गुप्ता यांनी दिला.
शेजारी राहणाऱ्या नराधमाने केला नात्याचा गैरवापर
प्राप्त माहितीनुसार, ही संतापजनक घटना २८ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी घडली होती. पीडित बालिकेच्या घराशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीला पीडिता ‘मामा’ म्हणून हाक मारत होती. याच नात्याचा गैरफायदा घेत आणि घराशेजारी असण्याचा गैरवापर करून संबंधित आरोपीने तिच्यावर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. पीडितेच्या वर्तनात बदल जाणवल्याने तिच्या आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने तिच्यासोबत घडलेला सर्व भयानक प्रकार आईला सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट केले.
घडलेल्या गंभीर प्रकारानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ तत्परता दाखवत गुन्हा रजिस्टर क्रमांक २०१/२०२३ अन्वये भादंवि कलम ३७६(३), ३७६(२)(एन), ४५०, ५०६ सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो – POCSO) कलम ४ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या.
या गुन्ह्याचा सखोल तपास चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली आगलावे यांनी केला. त्यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, ठोस वैद्यकीय पुरावे, न्यायवैद्यक अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावे अचूकपणे गोळा करून वेळेत न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र दाखल केले.
हा खटला चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आला असता, सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. आसीफ शेख यांनी बाजू मांडली. त्यांनी न्यायालयात प्रत्यक्ष साक्षीदारांचे जबाब आणि वैद्यकीय पुरावे अत्यंत प्रभावीपणे मांडून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि सादर केलेले भक्कम पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला कलम ३७६(२)(एन) अंतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास आणि कलम ५०६(II) अन्वये २ वर्षांचा सश्रम कारावास सुनावला.
सदर प्रकरणातील तपास, कायदेशीर बाजू आणि निकाल प्रक्रियेत तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली आगलावे, सरकारी अभियोक्ता ॲड. आसीफ शेख, देखरेख अधिकारी पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके, कोर्ट पैरवी अधिकारी महिला पोलीस हवालदार किशोरी वामनराव गोंडे (ब.नं. २३७०) तसेच दोषसिद्धी कक्षाचे विशेष योगदान राहिले. ही संपूर्ण यशस्वी कामगिरी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मा. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक मा. ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






