Brahmapuri Crime News चंद्रपूर न्यायालय आणि पोलीस तपास निकाल

संशयाचे भयंकर टोक; ब्रह्मपुरीतील हल्लेखोर पतीला अखेर शिक्षा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 31, 2026

चंद्रपूर / ब्रह्मपुरी: Brahmapuri Crime News समोर आली असून पत्नीवर सत्तूरने हल्ला करणाऱ्या पतीला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. आरोपी पतीला ५ वर्षांचा सक्त कारावास आणि ५ हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त १ महिन्याचा साधा कारावास भोगावा लागेल. (हे हि वाचा – धावत्या दुचाकीवरून मुलीने मारली उडी, विकृताला बेड्या)

चारित्र्याच्या संशयावरून पतीने भररस्त्यात पत्नीवर जीवघेणा वार केला होता. पोलिसांनी वेळेत भक्कम पुरावे सादर केल्याने आरोपीला ही कठोर शिक्षा झाली.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर भरदिवसा सत्तूरने सपासप वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला चंद्रपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने आरोपी पतीला पाच वर्षांचा सक्त कारावास आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला असून दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Brahmapuri Crime News : काय आहे नेमकी घटना?

सदर थरारक घटना ३ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली होती. पीडित महिला आपले हॉस्पिटलमधील काम आटोपून घराकडे परत जात असताना, स्वागत मंगल कार्यालयाच्या मागे तिच्या पतीने तिला अडवले आणि घरी चालण्यास सांगितले. मात्र पत्नीने घरी जाण्यास नकार दिल्याने संतापलेल्या आरोपी पतीने जुन्या संशयावरून तिच्यावर सत्तूरने हल्ला चढवला. त्याने पत्नीच्या डोक्यावर, हातावर आणि पायावर सत्तूरने सलग दोन ते तीन वार करून तिला जागीच ठार मारण्याचा प्रयत्न केला. या गंभीर हल्ल्यात महिला रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाली होती.

ब्रह्मपुरी पोलिसांची तत्परता आणि कलम ३०७ अन्वये गुन्हा

या घटनेनंतर पीडितेच्या तक्रारीवरून तसेच वैद्यकीय अहवालाच्या आधारे ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८/२०२३, भादंवी कलम ३०७ अन्वये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा तपास ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र प्रभाकर उपरे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक व वैद्यकीय पुरावे अतिशय सूक्ष्मपणे गोळा करून वेळेत न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र सादर केले.

हा खटला चंद्रपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश मा. श्री. पी. एम. गुप्ता यांच्यासमोर चालवण्यात आला. सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट सुधाकर डेगावार यांनी प्रभावी युक्तिवाद केला. साक्षीदारांचे जबाब आणि वैद्यकीय पुराव्यांची साखळी लक्षात घेऊन न्यायालयाने ३१ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपीला भादंवी कलम ३०७ अंतर्गत दोषी ठरवत पाच वर्षांची सक्त मजुरी व दंडाची शिक्षा सुनावली.

सदर खटल्यात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार प्रकाश शेंदरे (ब.नं. २२७) आणि चंद्रपूर येथील दोषसिद्धी कक्षाने महत्त्वाची भूमिका बजावली. ही संपूर्ण यशस्वी कामगिरी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. न्यायालयात भक्कम पुरावे मांडून आरोपीला शिक्षा मिळवून दिल्याबद्दल पोलिसांच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment