चंद्रपूर / भद्रावती : KPCL Baranj Coal Mine परिसरातून झाडांची बेकायदेशीर कत्तल करून लाकूड चोरण्याचा मोठा प्रयत्न सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. भद्रावती पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळावरून लाकडासह एक ट्रॅक्टर, दोन कटर मशीन आणि तीन कुऱ्हाडी जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत ४ लाख ३० हजार ३०० रुपये आहे. (हे हि वाचा – संशयाचे भयावह टोक, पतीने केला पत्नीवर हल्ला)
KPCL Baranj Coal Mine : झाडांची बेकायदेशीर तोड आणि चोरीचा प्रयत्न
भद्रावती परिसरातील बरांज तांडा येथील ‘केपीसीएल’ (KPCL) कोळसा खदान क्षेत्रात प्रदूषण नियंत्रणासाठी लावण्यात आलेली झाडे बेकायदेशीररीत्या तोडून लाकूड चोरण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. या प्रकरणात भद्रावती पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून घटनास्थळावरून ट्रॅक्टर, कटर मशीन आणि कुऱ्हाडीसह ४ लाख ३० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बरांज कोळसा खदान परिसरात कोळसा उत्खननादरम्यान होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कंपनीच्या जागेत सुमारे १० वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले होते. ही झाडे आता १५ ते २० फुटांपर्यंत वाढली आहेत. ३० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजण्याच्या सुमारास जुन्या डंपिंग परिसरात काही अज्ञात व्यक्ती झाडे तोडून ट्रॅक्टरमध्ये भरत असल्याची माहिती सुरक्षा विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे सुरक्षा अधिकारी जनार्धन यशवंत कामडे (वय ६३, रा. आकाशवाणी रोड, चंद्रपूर) यांनी इतर सुरक्षा रक्षकांसह बारूद मॅगझिनसमोरील तांडा रोडवर धाव घेतली.
त्या ठिकाणी स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरमध्ये (क्रमांक MH-34-BR-5537, ट्रॉली क्रमांक MH-34-A-2723) तोडलेले लाकूड भरून नेत असताना चालकासह इतर पाच जण रंगेहात मिळून आले. त्यांच्याकडे झाडे कापण्याच्या २ कटर मशीन आणि ३ कुऱ्हाडी आढळून आल्या. सुरक्षा रक्षकांनी चौकशी केली असता, संबंधितांनी लाकूड तोडण्यासाठी आलो असल्याची कबुली दिली, तसेच झाडे तोडून आणण्यासाठी अरविंद देवगडे यांनी ट्रॅक्टर दिल्याचे सांगितले.
या प्रकरणी चालक राजू शंकर कोतुलवार (रा. चालबर्डी), प्रदीप प्रभाकर कोसरे (वय ३०, रा. पिपरबोडी), दिलीप विठ्ठल जिवतोडे (वय ४०, रा. घोटनिंबाळा, ता. भद्रावती) तसेच रुही (ता. ब्रह्मपुरी) येथील रहिवासी आनंदराव आबाजी भोयर (वय ३५), योगेश आनंदराव मेश्राम (वय ३९) आणि मिथुन ताराचंद भोयर (वय २८) यांच्याविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ४ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर, २० हजार रुपयांचे लाकूड आणि १० हजार ३०० रुपयांची हत्यारे असा एकूण ४,३०,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रकाश खाडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






