कोरपना क्रेशर मशीन चोरी प्रकरणी पोलिसांनी जप्त केलेली मशीन

उड्डाणपुलाखालील मशीन गायब, कोरपना पोलिसांनी कसा लावला छडा?

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 29, 2026

कोरपना: कोरपना क्रेशर मशीन चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. उड्डाणपुलाखालून चोरी झालेली मशीन पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथून जप्त केली. या प्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तक्रारदाराने मशीन दुरुस्तीसाठी कोरपना येथील राज वर्कशॉपमध्ये नेली होती. वर्कशॉपसमोरील मोकळ्या जागेतून ती गायब झाली. तक्रारीनंतर कोरपना पोलिसांनी बीएनएस कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवला. गोपनीय माहितीच्या आधारे तपास मारेगावपर्यंत पोहोचला. (गणपती बघायला चल, नकार मिळाल्यावर घडलं भयावह, वाचा महत्वाची बातमी)

दुरूस्तीसाठी वर्कशॉपबाहेर उड्डाणपुलाखाली ठेवलेली क्रेशर मशीन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा छडा लावत कोरपना पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथून चोरी गेलेली क्रेशर मशीन जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कोरपना क्रेशर मशीन चोरी नेमकी कशी घडली?

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची क्रेशर मशीन नादुरुस्त झाल्याने त्यांनी ती दुरुस्तीसाठी कोरपना येथील राज वर्कशॉप येथे नेली होती. मात्र वर्कशॉप मालक गावी जात असल्याने त्यांनी पंधरा दिवसांनंतर येण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने मशीन घरी न नेता वर्कशॉपसमोरील उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेत ठेवली होती. शेतीची कामे संपल्यानंतर तक्रारदार मशीन पाहण्यासाठी गेले असता उड्डाणपुलाखालून क्रेशर मशीन गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सर्वत्र शोध घेऊनही मशीन न मिळाल्याने त्यांनी कोरपना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून कोरपना पोलिसांनी कलम ३०३ (२) बीएनएस अन्वये गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

कारवाईत सहभागी पोलीस पथक आणि पुढील तपास

ठाणेदार पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राकेश वाकुलकर यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला. तपासादरम्यान गोपनीय माहितीदाराकडून चोरी गेलेली क्रेशर मशीन यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथे असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे कोरपना पोलिसांचे पथक तत्काळ मारेगाव येथे रवाना झाले. तेथील जयकिशन फॅब्रिकेशन वर्कशॉपवर धाड टाकून पोलिसांनी चोरी झालेली क्रेशर मशीन शोधून काढली व कायदेशीर प्रक्रियेनुसार ई-साक्ष पंचनामा करून मोबाईलमध्ये चित्रीकरण करत मशीन जप्त केली.

या कारवाईदरम्यान संशयित आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. सदर यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयूष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लता वाढीवे, पोलीस हवालदार राकेश वाकुलकर व पोलीस शिपाही विशाल मोरे यांनी पार पाडली. परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे कोरपना पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment