पोंभूर्णा गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान बस स्थानक चौकात तैनात पोलीस

पोंभूर्णा येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की, २१ जणांवर गुन्हे दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 29, 2026

पोंभूर्णा (चंद्रपूर): पोंभूर्णा गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान बस स्थानक चौकात रस्ता रोखल्याच्या आरोपावरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या तक्रारीनुसार, मिरवणुकीला प्रशासनाची परवानगी नव्हती. तेली मोहल्ला येथील एका गणेश मंडळाच्या २१ नामजद कार्यकर्त्यांसह इतर काही जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २८ सप्टेंबरच्या रात्री हा प्रकार घडला. मिरवणूक पुढे नेण्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याचा आणि पोलिसांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप आहे. भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार पुढील तपास सुरू आहे. (उड्डाणपुलाखालील मशीन गायब, कोरपना पोलिसांनी लावला छडा, वाचा तपासाची कहाणी)

पोंभूर्णा गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान बस स्थानक चौकातील घटना

पोंभूर्णा शहरातील बस स्थानक चौकात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता आणि मद्यप्राशन करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोंभूर्णा पोलिसांनी विघ्नहर्ता गणेश मंडळ, तेली मोहल्ला येथील २१ नामजद कार्यकर्त्यांसह इतर ८ ते १० महिला व पुरुषांवर विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास हनुमान चौक, तेली मोहल्ला येथील विघ्नहर्ता गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते दारू पिऊन गणपती विसर्जन मिरवणूक काढत होते. यावेळी मिरवणूक पुढे घेण्याबाबत पोलीस आणि प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात येत होत्या, परंतु कार्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. बेकायदेशीर जमाव जमवून त्यांनी ट्रॅक्टर (क्र. MH 34 BR 0939) व इतर वाहने बस स्थानक चौकातील मुख्य रस्त्यावर उभी करून रस्ता पूर्णपणे अडवून धरला. इतकेच नव्हे तर, इतर सहकाऱ्यांना रस्त्यावर बसण्यास चिथावणी देऊन मागे असलेल्या शास्त्री नगर येथील सूर्यदेव गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला पुढे जाण्यास मज्जाव केला.

पोलीस व प्रशासनाने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला असता, ‘आम्हाला रात्री ११ वाजेपर्यंत परवानगी आहे, तुम्ही आम्हाला पुढे जाण्यास का सांगता?’ असा सवाल करत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हुज्जत घातली. याच दरम्यान नाचण्याच्या कारणावरून मंडळातील कार्यकर्त्यांमध्येच आपापसात वाद सुरू झाला. हा वाद सोडवण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली असता, संतप्त कार्यकर्त्यांनी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाच धक्काबुक्की केली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपली वाहने रस्त्यावरच उभी ठेवून रस्ता रोखून धरला. या वेळी एका महिला अंमलदाराने मध्यस्थी करून समजावण्याचा प्रयत्न केला असता, अलका नैताम नावाच्या महिलेने तिच्याशी झटापट करून मारहाण केली आणि उपस्थित लोकांना रस्त्यावर बसण्यासाठी चिथावणी दिली.

पोलीस कर्मचाऱ्यांशी वादाचा आरोप

घटनेचे गांभीर्य ओळखून पोंभूर्णाचे तहसीलदार, मुख्याधिकारी आणि मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी स्वतः घटनास्थळी दाखल होऊन आंदोलक व कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर ठिय्य मांडून राहिले आणि पोलिसांना ‘बडतर्फ करा, निलंबित करा’ अशा घोषणा देत जोरदार आरडाओरड करू लागले. २८ सप्टेंबर रोजी रात्री ८:१५ ते २९ सप्टेंबर रोजी पहाटे १:३० वाजेपर्यंत हा सगळा गोंधळ सुरू होता.

शासकीय आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर जमाव जमवणे, वाद घालणे, चिथावणी देणे, मुख्य रस्ता अडवणे आणि पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करणे याप्रकरणी पोलीस अंमलदार मंगेश कनिराम श्रीरामे यांच्या तक्रारीवरून पोंभूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेत बालाजी वसंत भांडेकर, कपिल लक्ष्मण बावणे, राहुल प्रभाकर देवतळे, वृषभ अरुण नैताम, महेश अरुण नैताम, अमित नंदकिशोर नैताम, अमित दादाजी भांडेकर, अजित सदाशिव धोडरे, प्रतीक शालीक दुधबळे, राकेश ऋषीदेव देवतळे, निखिल संतोष शेट्टे, साहिल बाळू नैताम, विनोद अशोक चांदेकर, संतोष उद्धव पारलेवार यांच्यासह फरार असलेले दिनेश नैताम, निखिल आरमिडवार, जयंत टेकाम, राकेश मोगरकर, गुणवंत उर्फ अनुराग धोडरे, संदेश धोडरे आणि अलका नैताम अशा २१ आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक राहुल शंकर ठेंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment