वरोरा : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या टेंभूर्डा परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी एका तरुणाला विनापरवाना जीवघेणे धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी रंगेहात अटक केली आहे. ही घटना २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून, आरोपीकडून एक मोठा धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे. (डीबी पथकाने मागितले ७० हजार, वाचा हि बातमी)
मिळालेल्या माहितीनुसार, वरोरा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) शरद श्याम भस्मे हे आपल्या पथकासह—ज्यात पोलीस हवालदार अमोल नवघरे, सुखराज यादव, पोलीस अंमलदार महेश गावतुरे आणि सौरभ कुलते यांचा समावेश होता—टेंभूर्डा परिसरात रात्रीच्या वेळी नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. दरम्यान, एका गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की, नागपूर-चंद्रपूर हायवे रोडवर टेंभूर्डा हुडकी समोरील रणजित मडावी यांच्या विटाभट्टीजवळ आशीष आत्राम नावाचा तरुण बेकायदेशीरपणे धारदार शस्त्र बाळगून फिरत आहे.
वरोरा विनापरवाना शस्त्र प्रकरणात तरुणाला अटक
माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हालचाली करत मौजा टेंभूर्डा बस स्टॉपवरून वीरेंद्र गोविंदसिंग चंदेल आणि आनंद विजयसिंग कश्यप या दोन पंचांना बोलावून घटनेची सविस्तर कल्पना दिली व लेखी सूचनापत्र देऊन त्यांना सोबत घेतले. त्यानंतर पोलीस पथक आणि पंचांनी संशयित ठिकाणी छापा टाकला. विटाभट्टीजवळ पोहोचल्यानंतर तेथे एक तरुण संशयास्पद स्थितीत उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नाव-पत्ता विचारला असता, त्याने आपले नाव आशीष संजय आत्राम (वय २६ वर्षे, रा. टेंभूर्डा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) असे सांगितले.
त्याच्या संशयास्पद हालचालींवरून पंचांसमक्ष त्याच्या पाठीवरील कॉलेज बॅगची कायदेशीर झडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान बॅगमध्ये एक अत्यंत घातक व धारदार लोखंडी चाकू आढळून आला. या चाकूची एकूण लांबी ४५.५ सेमी असून त्याच्या धारदार पात्याची लांबी ३१ सेमी, मध्यभागी रुंदी ७ सेमी, मुठीची लांबी १४.५ सेमी आहे, तसेच या चाकूला दोन्ही बाजूंना दहा टोके असल्याचे निष्पन्न झाले. या सुमारे १,००० रुपये मूल्याच्या शस्त्राबाबत विचारपूस केली असता, आरोपीकडे कोणतेही वैध परवाने नसल्याचे समोर आले.
पोलीस पथकाने जागेवरच घटनास्थळ व जप्ती पंचनामा करून सदर शस्त्र हस्तगत केले. याप्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांच्या तक्रारीवरून आरोपी आशीष आत्राम याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा (आर्म्स ॲक्ट) कलम ४ आणि २५ अन्वये वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत माधवराव गौरकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






