वरोरा (चंद्रपूर): वरोरा जबरी चोरी प्रकरणात पोलिसांनी १९ वर्षीय प्रज्वल प्रमोद झिले (रा. टेंमुर्डा) याला अटक केली आहे. ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३:१५ वाजता घरात घुसून तरुणीला बेडरूममध्ये डांबल्याची घटना घडली होती. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे वरोरा पोलिसांनी २४ तासांत आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. (७० वर्षीय पतीला ६५ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय, केला हल्ला, वाचा संशयाची बातमी)
वरोरा शहर परिसरामध्ये भरदिवसा घरात घुसून तरुणीला बेडरूममध्ये डांबून चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अवघ्या २४ तासांच्या आत गजाआड करण्यात वरोरा पोलिसांना यश आले आहे. ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३:१५ वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे प्रज्वल प्रमोद झिले (वय १९ वर्ष, रा. टेंमुर्डा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) या शिक्षण घेणाऱ्या तरुणाला तत्परतेने अटक केली आहे.
वरोरा जबरी चोरी: घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी कॉलेजवरून घरी परतली असता तिला घराचा वॉलकंपाउंडचा गेट बंद आणि मुख्य दरवाजा उघडा दिसला. तिने घरात जाऊन पाहिले असता बेडरूमच्या दरवाजाजवळ तोंडाला दुपट्टा बांधलेला अंदाजे २५ वर्षांचा एक अनोळखी इसम उभा असलेला दिसला. घाबरलेल्या तरुणीने तात्काळ ओरडण्याचा प्रयत्न केला असता, त्या भामट्याने तिचा हात पकडून ओढतान केली आणि तिला बेडरूममध्ये ढकलून दिले. या झटापटीत तरुणी खाली पडल्याने तिच्या डाव्या हाताच्या ढोपराला आणि करंगळीला दुखापत झाली. त्यानंतर चोरट्याने बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद करून तरुणीला आत डांबून ठेवले आणि तिथून पळ काढला.
तरुणीला बेडरूममध्ये डांबले आणि ५००० रुपये गायब
दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांची पत्नी शेतातून घरी परतले असता त्यांना मुख्य दरवाजा उघडा दिसला व बेडरूममधून मुलीचा आवाज ऐकू आला. फिर्यादींनी तातडीने बेडरूमचा कडी-कोयंडा उघडून मुलीची सुटका केली. त्यानंतर घरातील अलमारीची पाहणी केली असता, अलमारीत ठेवलेले रोख ५००० रुपये गायब असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन वरोरा येथे अपराध क्रमांक १००४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३३१(३) व ३०९(४) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपी प्रज्वल प्रमोद झिले याला ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या आरोपीने पोलिसांच्या खाक्या दाखवताच अवघ्या २४ तासांत आपला गुन्हा कबूल केला, त्यानंतर १ ऑक्टोबर २०२६ रोजी त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनिष तालेवार, पोलीस हवालदार संदीप मुळे, प्रशांत नागोसे, पोलीस अंमलदार विशाल राजुरकर, मनोज ठाकरे, अमोल नवघरे, सौरभ कुलथे, सुखराज यादव व महेश गावतुरे यांनी पार पाडली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






