चंद्रपूर: Chandrapur Robbery Gang Arrested अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) सोन्याची साखळी पळवणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे.
पोलिसांनी थेट अकोला जिल्ह्यात शोधमोहीम राबवून दोन अट्टल गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे चंद्रपूर आणि नागपूर येथील ३ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. (हे हि वाचा – फार्म हाऊसवर जुगार १६ जण रंगेहात अडकले)
आरोपींकडून ३ लाख १४ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
रामनगर पोलीस ठाण्यातील सोन्याची साखळी चोरीचा उलगडा
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील वाढत्या जबरी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या सूचनेनुसार विशेष तपास मोहीम हाती घेण्यात आली होती. या तपासादरम्यान रामनगर पोलीस ठाण्यात दाखल अप.क्र. १००४/२०२६ (कलम ३०४(२), ३(५) BNS) मधील घटनेचा तांत्रिक आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बारकाईने अभ्यास करण्यात आला. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वातील पथकाने अकोला जिल्ह्यातील दहीहांडा परिसरात शोधमोहीम राबवून मुस्तफा उर्फ शानू जमील खान (वय ४४ वर्ष, रा. लाल स्कूलजवळ, मोमीनपुरा, नागपूर) आणि सलमान अब्दुल रहमान (वय २५ वर्ष, रा. कुरेशीनगर, दहीहांडा, जि. अकोला) या दोघांना बेड्या ठोकल्या.
ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी मुस्तफा उर्फ शानू जमील खान याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर मोटारसायकल, मोबाईल, हेल्मेट, कॉलेज बॅग आणि कपडे असा ८४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर आरोपी सलमान अब्दुल रहमान याच्याकडून चोरीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीतून मिळालेली रोकड, इतर मालमत्ता आणि मोबाईल असा २,३०,५०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. अशा प्रकारे दोन्ही आरोपींकडून एकूण ३,१४,५०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
विशेष म्हणजे, मुख्य आरोपी मुस्तफा उर्फ शानू याच्यावर नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वीही जबरी चोरी आणि घरफोडीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या चौकशीत त्याने नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून तब्बल ३४ तोळे सोन्याचे दागिने लांबवल्याची कबुली दिली असून, त्या गुन्ह्याचाही आता उलगडा झाला आहे. या कारवाईमुळे रामनगर ठाण्यातील दोन जबरी चोरीचे (अप.क्र. १००४/२०२६ व ९९६/२०२६) आणि पाचपावली ठाण्यातील घरफोडीचा (अप.क्र. ४८९/२०२६) असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी रामनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही यशस्वी आणि कामगिरी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आणि त्यांच्या विशेष पथकातील अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






