Chandrapur Illegal Arms Smuggling accused arrested by LCB Police

बिहार ते नागपूर ट्रेन, पुढे ऑनलाईन कार; चंद्रपुरात शस्त्रे विकायला आले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 22, 2026

चंद्रपूर: Chandrapur Illegal Arms Smuggling प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीचा शस्त्रतस्करीचा डाव पूर्णपणे उधळून लावला.

नागपूरकडून येणाऱ्या कारमधून २ बनावट पिस्तुले आणि १३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या कारवाईत बिहारमधील तीन सराईत तस्करांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण ६ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पडोली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हे हि वाचा – मारहाणीच्या घटनेने उघड झालं भयावह कांड)

चंद्रपूर जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांची तस्करी, विक्री आणि बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत आंतरराज्यीय शस्त्रतस्करीचा मोठा डाव उधळून लावला आहे. बिहार राज्यातून चंद्रपूर शहरात विक्रीसाठी आणलेली दोन बनावट पिस्तुले, दोन मॅगझिन, १३ जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ६ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, या प्रकरणी बिहारमधील तीन सराईत तस्करांना अटक करण्यात आली आहे.

जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या आणि त्यांची तस्करी करणाऱ्यांवर कडक नजर ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोध मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेदरम्यान २१ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखालील पथक अवैध शस्त्रे, जुगार व इतर बेकायदेशीर कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी गस्तीवर होते. त्याच वेळी गोपनीय खबऱ्यामार्फत नागपूरकडून चंद्रपूरच्या दिशेने एका पांढऱ्या रंगाच्या टाटा झेस्ट कारमधून काही व्यक्ती बेकायदेशीर अग्निशस्त्रांची मोठी खेप घेऊन येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २२ ऑगस्ट रोजी पहाटे पडोली चौक परिसरात अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने नाकाबंदी लावली.

दोन बनावट पिस्तुले आणि १३ जिवंत काडतुसांसह टाटा झेस्ट कार जप्त

नाकाबंदी दरम्यान संशयित पांढऱ्या रंगाची टाटा झेस्ट कार (क्रमांक MH-14-GD-0708) वेगाने येताना दिसताच पोलिसांनी ती थांबवली. वाहनातील प्रवाशांकडे प्राथमिक विचारपूस केली असता त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पंचांसमक्ष संपूर्ण वाहनाची आणि त्यातील व्यक्तींची कसून अंगझडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान वाहनातील व्यक्तींच्या ताब्यातून दोन बनावट लोखंडी पिस्तुलसदृश अग्निशस्त्रे, दोन मॅगझिन, १३ जिवंत राउंड (काडतुसे) आणि तीन महागडे मोबाईल फोन मिळून आले. पोलिसांनी तत्काळ ही अग्निशस्त्रे, काडतुसे, मोबाईल आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण ६ लाख ४८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून तिघांनाही जागीच ताब्यात घेतले.

बिहार राज्यातील दरभंगा येथील ३ सराईत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दुर्गेशकुमार सुधिर मिश्रा (वय २६, रा. गोपालपूर, ता. केवटी, जि. दरभंगा, बिहार), रविकुमार राजकुमार पासवान (वय १९, रा. पिंडारूज, ता. केवटी, जि. दरभंगा, बिहार) आणि सुनिलकुमार विजय साहानी (वय २०, रा. गोपालपूर, ता. केवटी, जि. दरभंगा, बिहार) यांचा समावेश आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत या तस्करांनी ही घातक शस्त्रे बिहार राज्यातून आणल्याची कबुली दिली आहे. नागपूरपर्यंत रेल्वे किंवा इतर मार्गाने पोहोचल्यानंतर त्यांनी पोलिसांची नजर चुकवण्यासाठी नागपूर येथून चंद्रपूरसाठी ऑनलाइन कार बुक केली होती. चंद्रपूर शहरात ही शस्त्रे कोणाला आणि कोणत्या उद्देशाने विकली जाणार होती, तसेच या आंतरराज्यीय रॅकेटमध्ये आणखी कोणकोणत्या स्थानिक अथवा बाहेरील व्यक्तींचा सहभाग आहे, याचा सखोल शोध आता पोलीस घेत आहेत.

या गंभीर प्रकरणी पडोली पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३ आणि २५ अन्वये गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना पडोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कंक्रेडवार, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनील गौरकार, तसेच पोलीस अंमलदार सतीश अवथरे, लालू यादव, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, संदीप कांबडी, शरद कुडे, अजय बागेसर, गणेश भोयर, रामा बिंगेवार, शशांक बदामवार, किशोर वाकाटे, शेखर माथनकर, चालक वृषभ बारसिंगे आणि सायबर सेलचे कार्तिक खनके, गुणवंत व अनिमेश यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. चंद्रपूर जिल्ह्यात अशा प्रकारे बेकायदेशीर कारवाया करणाऱ्या समाजकंटकांवर यापुढेही कठोर प्रहार केला जाईल, असा सज्जड इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment