चंद्रपूर: Chandrapur Police TEENS Workshop अंतर्गत चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात भव्य कार्यशाळा पार पडली. जिल्हा पोलीस दल आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यशाळेत १०७२ मुख्याध्यापक, शिक्षक, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. (हे हि वाचा – शस्त्राची डिलिव्हरी करण्यासाठी ऑनलाईन कार बुक केली, LCB ने खेळला कारवाईचा डाव, तिघांना अटक)
याप्रसंगी सायबर गुन्हे आणि तरुणांच्या ताणतणाव व्यवस्थापनावर तज्ज्ञांनी मोलाचे कायदेशीर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण, वाढत्या सायबर गुन्ह्यांचे धोके आणि शालेय वयातील ताणतणाव व्यवस्थापन यांसारख्या संवेदनशील विषयांवर जनजागृती निर्माण करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल आणि रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात १०७२ प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग
चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात पार पडलेल्या ‘टीन्स’ (TEENS – Teachers Educating, Empowering & Nurturing Students) या जनजागृती कार्यशाळेत जिल्ह्यातील तब्बल ९२६ मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, रोटरी क्लबचे ६७ सदस्य, १५ बँक कर्मचारी तसेच विशेष किशोर पोलीस युनिट (SJPU) व भरोसा सेलचे ६४ पोलीस अधिकारी व अंमलदार अशा एकूण १ हजार ७२ प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी श्रीमती वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद संपन्न झाली.
शाळांमध्ये पोक्सो कायद्याची अंमलबजावणी आणि पोलिसांचे कायदेशीर मार्गदर्शन
कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायद्यातील विविध कडक तरतुदी आणि शाळांच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांवर सविस्तर प्रकाश टाकला. शाळांमध्ये बालकांसाठी भयमुक्त व सुरक्षित वातावरण निर्माण करणे, कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी (Police Verification) करून घेणे आणि पीडित बालकाची ओळख कोणत्याही परिस्थितीत गोपनीय ठेवणे अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोक्सो कायद्याच्या कलम १९ नुसार अशा गुन्ह्यांची माहिती तात्काळ पोलिसांना देणे बंधनकारक असून माहिती दडपल्यास कठोर शिक्षेची कायदेशीर तरतूद असल्याचे सांगत बालकांच्या मदतीसाठी ‘चाइल्ड हेल्पलाइन १०९८’ चा प्रभावी वापर करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले.
डिजिटल अरेस्ट, एपीके मालवेअर आणि वाढत्या सायबर गुन्ह्यांचे धोके
याच सत्रात सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुजावर अली यांनी डिजिटल अरेस्ट, बनावट एपीके मालवेअर (उदा. गॅस बिल, कुरिअर व विवाह निमंत्रण लिंक्स), व्हॉट्सॲप हॅकिंग, फिशिंग, टास्क फ्रॉड, सेक्सटॉर्शन, ऑनलाइन गेमिंग, डीपफेक आणि शेअर मार्केट फसवणुकीच्या वाढत्या गुन्हेगारी जाळ्याचा पर्दाफाश केला. सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहण्यासाठी सोशल मीडियावर टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुरू ठेवणे, अनधिकृत कॉल फॉरवर्डिंग रद्द करण्यासाठी ‘##००२#’ या कोडचा वापर करणे, चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाईल ब्लॉक व ट्रॅक करण्यासाठी ‘CEIR’ पोर्टलचा वापर करणे, संशयास्पद कॉल्स व मेसेजची तक्रार करण्यासाठी ‘चक्षू’ पोर्टल तसेच ‘एम-कवच २’ ॲप वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला. सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास पहिल्या ‘गोल्डन अवर’मध्ये तात्काळ १९३० हेल्पलाइन क्रमांकावर किंवा cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
कार्यशाळेत तरुणाईचे मानसशास्त्र आणि ताणतणाव व्यवस्थापनावर क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट मानसी मोरे नोपाणी यांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या भावनिक व वैचारिक मेंदूतील फरक, योग्य निर्णयक्षमतेसाठी उपयुक्त ठरणारा ‘Stop-Think-Choose’ फॉर्म्युला आणि शिक्षकांसाठी तणावमुक्तीकरिता ग्राउंडिंग तंत्र समजावून सांगितले. विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी पोक्सो, सायबर सुरक्षा आणि विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र हे विषय दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद करत शिक्षकांनी नियमित योगाभ्यास व सकारात्मक दृष्टिकोनातून भावी पिढीला घडवावे, असा संदेश दिला. जिल्हा परिषदेच्या अपर मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षिरसागर यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लबच्या अध्यक्षा स्मिता जिवतोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रोटरीचे सचिव विशाल खांडरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा वाडेकर यांनी मानले. बालसुरक्षा व सायबर गुन्हे प्रतिबंधासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास यावेळी पोलीस प्रशासनाने व्यक्त केला.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






