चंद्रपूर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित Chandrapur Teacher Award सोहळ्यात विदर्भातील १०० मान्यवरांचा गौरव करण्यात आला. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि वंजारी फाउंडेशनने प्रियदर्शिनी सभागृहात हा भव्य कार्यक्रम घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुधाकर अडबाले होते. आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या हस्ते सोहळ्याचे शानदार उद्घाटन पार पडले. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची समाजाने घेतलेली ही पावती असल्याचे अडबाले म्हणाले. (हे हि वाचा – ४ वर्षीय अधीर करणार भारताचे प्रतिनिधित्व)
Chandrapur Teacher Award सोहळ्यात मान्यवरांचा गौरव
शिक्षक दिनाचे औचित्य साधून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, गोविंदराव वंजारी फाउंडेशन तसेच गोविंद मैना फाउंडेशन, चंद्रपूर यांच्या वतीने ‘सन्मान कर्तृत्वाचा – उत्कृष्ट शिक्षक सन्मान सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे रविवारी सकाळी ११ वाजता झालेल्या या सोहळ्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य, संस्था चालक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
प्रियदर्शिनी सभागृहात उत्कृष्ट शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले होते. आमदार ॲड. अभिजितजी वंजारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांच्यासह आजचे सत्कारमूर्ती, शिक्षण क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य कार्यासाठी समर्पित करणारे माजी शिक्षक आमदार व्ही. यू. डायगव्हाणे सर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे, सौ. पुष्पाताई डायगव्हाणे, विमाशी संघाचे अधिकृत उमेदवार दिलीप कडू, गोविंद मैना फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. सीमा अडबाले, गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या कोषाध्यक्ष सौ. स्मीता वंजारी, शिवाजी ढुमणे तसेच तिन्ही जिल्ह्यांतील विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी, प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यात माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सपत्नीक सन्मानित करण्यात आले. यानंतर चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातील उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य, संस्था चालक अशा एकूण १०० सत्कारमूर्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिक्षकांच्या कर्तृत्वाला समाजासमोर अधोरेखित करणारा हा सोहळा शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीमुळे विशेष ठरला.
प्रास्ताविक अरविंद देशमुख यांनी, कार्यक्रमाचे संचालन सुनील शेरकी, प्रज्ञा बारेकर, रूपाली मुंगल यांनी, पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या नावांची यादी वाचन गडचिरोली जिल्ह्यासाठी अजय लोंढे, वर्धा जिल्ह्यासाठी सूहास गवते आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी हरीहर खरवडे यांनी, तर आभारप्रदर्शन दीपक धोपटे यांनी केले.
कर्तृत्वाची समाजाने घेतलेली दखल : आमदार सुधाकर अडबाले
आज आपण ‘आदर्श शिक्षक’ नव्हे, तर ‘उत्कृष्ट शिक्षक’ या संकल्पनेचा सन्मान करत आहोत. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, मुख्याध्यापक आणि संस्थाचालक अशा सर्व घटकांचा आपण या ठिकाणी सन्मान केला आहे. हा पुरस्कार देण्यासाठी आम्ही कोणतीही निवड समिती स्थापन केलेली नाही. कोणाकडून प्रस्ताव मागवले नाहीत. बायोडाटा मागवला नाही. दहा प्रस्तावांमधून एकाची निवड करण्याची पद्धतही आम्ही स्वीकारलेली नाही. कारण प्रस्ताव मागवून केलेल्या निवडीमध्ये कोणीतरी निवडले जाते आणि कोणीतरी नाराज होते. आम्ही कोणाचेही प्रस्ताव मागवलेले नाहीत.
आमच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे मूल्यमापन केले आणि त्यातून उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींची निवड केली. म्हणूनच आजच्या या सन्मानाबद्दल कोणालाही नाराज होण्याचे कारण नाही. हा पुरस्कार म्हणजे केवळ एक सन्मानपत्र किंवा पुरस्कार नाही; हा आपल्या कर्तृत्वाची समाजाने घेतलेली दखल आहे. कारण शिक्षकांच्या प्रश्नांसाठी, शिक्षण क्षेत्राच्या भविष्यासाठी आणि मराठी माध्यमाच्या शाळांच्या अस्तित्वासाठी आपला आवाज सभागृहात बुलंद असणे आवश्यक आहे. शिक्षकांच्या आणि शिक्षण क्षेत्राच्या प्रश्नांसाठी सभागृहात ठामपणे उभे राहणारा असा आमदार आपल्याला आवश्यक आहे, असे आव्हान देखील आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.
‘शिक्षक हा समाज घडविणारा महत्त्वाचा घटक’ : ॲड. अभिजित वंजारी
कार्यक्रमाचे उद्घाटन करताना नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी म्हणाले की, विदर्भामध्ये शिक्षण क्षेत्रात किंवा विविध संघटनांच्या माध्यमातून सातत्याने काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून योग्य शिक्षकांची शिफारस झाली पाहिजे आणि संबंधित शिक्षकाच्या कर्तृत्वाची खात्री झाल्यानंतरच त्याचा सन्मान झाला पाहिजे. ही भूमिका संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनामागे होती आणि म्हणूनच हा कार्यक्रम वेगळा व विशेष ठरतो, असे त्यांनी सांगितले. कोरोना काळात शिक्षकाचे महत्त्व संपूर्ण समाजाने अनुभवले. कोरोनाच्या कठीण परिस्थितीत डॉक्टरांनी केलेले कार्य आपण सर्वांनी पाहिले. त्या काळात डॉक्टर देवदूतापेक्षा कमी नव्हते. मात्र, त्याचप्रमाणे संपूर्ण समाज घडविण्याचे काम करणारा शिक्षकही तितकाच महत्त्वाचा आहे, असे वंजारी म्हणाले. ज्या पद्धतीने कुंभार मातीला आकार देऊन त्यातून सुंदर वस्तू तयार करतो, त्याच पद्धतीने शिक्षक विद्यार्थ्यांच्या कोऱ्या पाटीवर ज्ञान, संस्कार आणि मूल्यांचे संस्कार करून त्यांना घडवत असतो. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून समाज घडविणाऱ्या कर्तृत्वाचा सन्मान आहे, असे त्यांनी नमूद केले.
————
‘पुरस्कार मिळवणे नव्हे, कर्तृत्व टिकवणे महत्त्वाचे’ : व्ही. यू. डायगव्हाणे
सत्काराला उत्तर देताना माजी शिक्षक आमदार व्ही. यू. डायगव्हाणे म्हणाले, “आपण आज उत्कृष्ट शिक्षक म्हणून प्रमाणपत्र मिळवले आहे. पण हे प्रमाणपत्र मिळवणे जितके महत्त्वाचे आहे, त्यापेक्षा ते टिकवणे अधिक महत्त्वाचे आहे.” पुरस्कार मिळवणे एकदा शक्य असते; मात्र, आयुष्यभर त्या पुरस्काराला साजेसे कर्तृत्व टिकवणे ही खरी कसोटी असल्याचे त्यांनी सांगितले. “आजपासून ज्यांना हा पुरस्कार मिळणार आहे, ज्यांना उत्कृष्ट शिक्षक म्हणून गौरवले जाणार आहे, त्यांनी स्वतःला नेहमी उत्कृष्ट ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ‘आजच्या दिवसापुरता मी उत्कृष्ट शिक्षक आहे आणि उद्यापासून पुन्हा पूर्वीसारखाच,’ असे होता कामा नये,” असे आवाहन त्यांनी केले.
——
पुरोगामी विचारातून शिक्षणाचा विस्तार : डॉ. बबनराव तायवाडे
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले की, पुरोगामी विचारातून गावखेड्यातील गोरगरीब मुलगा असो किंवा मुलगी, तळागाळातील विद्यार्थी-विद्यार्थिनी असोत, त्यांना शिक्षणाच्या सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील आणि त्यांचे जीवनमान कसे उंचावता येईल, हा एकमेव धागा हृदयात आणि डोळ्यासमोर ठेवून आयुष्यभर काम केले.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






