चंद्रपूर: Chandrapur Student Felicitation कार्यक्रमाचे आयोजन रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने उत्साहात करण्यात आले. यावेळी आमदार अभिजीत वंजारी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सन्मान झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक श्यामबाबू पुगलिया उपस्थित होते. दहावीत ९० टक्क्यांपेक्षा जास्त आणि बारावीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. (हे हि वाचा – चंद्रपुरात पोलिसांचा रूट मार्च)
महिला बचत गट तसेच रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व आदर्श नागरिकांचा सत्कार सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी यांच्या शुभहस्ते हा गौरव सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक श्यामबाबू पुगलिया होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थापक अध्यक्ष सौ. चंदाताई मनोजराव वैरागडे यांनी संस्थेच्या प्रवासावर प्रकाश टाकला. अवघ्या १० महिलांपासून सुरू झालेल्या या बचत गटाचे रूपांतर आज कोट्यवधींची उलाढाल असणाऱ्या ‘रणरागिणी पतसंस्थेत’ झाल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे व आरोग्य तपासणी यांसारख्या उपक्रमांसोबतच नागरिकांच्या सेवेसाठी आपण राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगत त्यांनी सत्कारमूर्तींना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार: आमदार अभिजीत वंजारी
आजचे गुणवंत विद्यार्थी हे उद्याच्या सक्षम व सुजलाम्-सुफलाम् भारताचे खरे शिल्पकार आहेत, असे प्रतिपादन आमदार अभिजीत वंजारी यांनी केले. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकीही जपावी, असे आवाहन त्यांनी केले. विशेष अतिथी शिवानीताई वडेट्टीवार यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक शिष्यवृत्ती व शैक्षणिक संधी मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, शहरात महिलांचे मोठे संघटन उभे केल्याबद्दल चंदाताई वैरागडे यांच्या कार्याचा गौरव केला.
गुणवंतांचा व समाजसेवकांचा गौरव
सोहळ्यात इयत्ता दहावीत ९० टक्क्यांपेक्षा जास्त आणि बारावीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालकांसह सन्मान करण्यात आला. यासोबतच चंद्रपूरच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आदर्श नागरिकांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव झाला.
याप्रसंगी डॉ. इंदूताई अग्रवाल, शहर काँग्रेस अध्यक्ष शिवाराव पोलशेट्टी, ज्येष्ठ नेते रामूभाऊ तिवारी, ॲड. विजयराव मोगरे, प्राचार्य नरेंद्र बोबडे, संतोषभाऊ कुचनकर, नगरसेविका संजीवनी वासेकर, अनिता चौखे, करिश्मा जंगम, अभिषेक डोइफोडे, वनश्री मेश्राम, सोनिया उंदिरवाडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाला लालपेठ, बाबूपेठ, माना टेकडी परिसरासह शहरभरातून नागरिक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सौ. सारिका कुचनकर यांनी केले, तर आभार स्वाती जनबंधू यांनी मानले.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






