चंद्रपूर: Chandrapur Crime News अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. बल्लारशा हद्दीत विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका आलिशान डस्टर कारमधून लाखो रुपयांची दारू जप्त केली. या धडक कारवाईत एकूण ५ लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे.
कारमधील दोन तस्करांना पोलिसांनी तात्काळ अटक केली असून बल्लारपूर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. (हे हि वाचा – स्थानिक गुन्हे शाखेने केली ६५ गोवंशाची सुटका)
Chandrapur Crime News : स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम तीव्र केली असून, बल्लारशा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आलिशान कारमधून चालणाऱ्या विदेशी दारूच्या मोठ्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी अवैध विदेशी दारूच्या साठ्यासह एक चारचाकी वाहन असा एकूण ५ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.
बल्लारशा हद्दीत गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची नाकाबंदी
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर अंतर्गत उपविभाग राजुरा पथकाने बल्लारशा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयित मार्गावर चोख नाकाबंदी लावली होती. दरम्यान, संशयास्पद वेगाने येणारी रेनॉल्ट डस्टर कार (क्रमांक MH 40 AC 9855) पथकाने अडवून तिची कसून झडती घेतली असता, वाहनामध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूचा साठा अवैधरित्या लपवून नेला जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वाहनातील सुमारे ५ लाख रुपये किमतीची डस्टर कार आणि त्यातील दारू असा सर्व ऐवज ताब्यात घेतला.
या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या दारूच्या साठ्यामध्ये १० हजार रुपये किमतीच्या ९० मिली क्षमतेच्या १०० सह्याद्री व्हिस्कीच्या बाटल्या, १२ हजार रुपये किमतीच्या १८० मिली क्षमतेच्या ४८ रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या बाटल्या, तसेच ३० हजार रुपये किमतीच्या ९० मिली क्षमतेच्या तब्बल २०० रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या बाटल्यांचा समावेश आहे. एकूण ५२ हजार रुपयांची विदेशी दारू आणि ५ लाख रुपयांची चारचाकी असा मिळून ५ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी घटनास्थळावरून नागेश पोचणा पाकूळवार (वय ३८ वर्षे) आणि मुरली वेंकटाद्री पचवा (वय २९ वर्षे, दोघेही रा. भेंडवी, ता. राजुरा, जि. चंद्रपूर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ) आणि ८३ अन्वये गुन्हा क्रमांक ९१८/२६ दाखल करण्यात आला असून, हा दारूचा साठा कुठून आणला जात होता आणि तो नेमका कुठे वितरित केला जाणार होता, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






