चंद्रपूर – मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलालगतच्या गावांमध्ये खबरदारी आवश्यक आहे. चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सारंग बोधे यांनी याबाबत आवाहन केले आहे. नागरिकांनी वन विभाग आणि वन विकास महामंडळाच्या (एफ.डी.सी.एम.) सूचना पाळाव्यात. जंगलात अनावश्यक प्रवेश टाळावा. शेतात काम करताना सतर्क राहावे. वन्यप्राणी दिसल्यास सुरक्षित अंतर ठेवून तत्काळ माहिती द्यावी. या ९ सूचना खाली दिल्या आहेत. (चंद्रपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन, वाचा बातमी)
मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाचे आवाहन
चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असून, जंगलालगतच्या गावांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात मानवी हस्तक्षेपामुळे व त्यांच्यातील वाढत्या संपर्कामुळे अशा घटनांची शक्यता निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर जंगलालगतच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे तसेच व एफ.डी.सी.एम. आणि वन विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सारंग बोधे यांनी केले आहे.
अशी घ्या खबरदारी
1. जंगलात अनावश्यक प्रवेश टाळावा, वनक्षेत्रात जाणे आवश्यक असल्यास वन विभागाच्या नियमांचे व सूचनांचे पालन करावे, 2. शेतीची कामे करताना सावधानता बाळगावी, जंगलालगतच्या शेतांमध्ये काम करताना परिसराची सतत पाहणी करावी. शक्यतो दिवसाच्या उजेडात शेतीची कामे पूर्ण करावीत. 3. एकट्याने जंगलात किंवा जंगलातून शेतात जाऊ नये, जंगलातून शेतात जाणे अथवा जंगलालगतच्या क्षेत्रात काम करणे आवश्यक असल्यास समूहाने जावे. 4. पहाटे व संध्याकाळच्या वेळेस विशेष काळजी घ्यावी. या वेळेत वन्यप्राण्यांची हालचाल अधिक असण्याची शक्यता असल्याने अनावश्यक बाहेर पडणे टाळावे.
5. वन्यप्राणी दिसल्यास सुरक्षित अंतर ठेवावे. वन्यप्राण्याच्या जवळ जाणे, त्याला चिथावणी देणे, पाठलाग करणे किंवा फोटो व व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी करणे टाळावे. 6. वन्यप्राण्यांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी टाळाव्यात, जंगलालगत अन्नपदार्थ किंवा कचरा उघड्यावर टाकू नये. पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे व त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. 7. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी, त्यांना एकटे बाहेर पाठवू नये. जंगलालगतच्या परिसरात लहान मुलांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवावे. 8. वन्यप्राण्यांच्या हालचालींची माहिती त्वरित द्यावी. गावाजवळ किंवा शेत परिसरात वन्यप्राणी दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न न करता त्वरित एफ.डी.सी.एम. तसेच वन विभागाला माहिती द्यावी. 9. वन्यप्राण्यांच्या हालचालींबाबत अप्रमाणित माहिती किंवा भीती निर्माण करणारे संदेश सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत.
वन्यप्राणी दिसल्यास नागरिकांनी शांतता राखावी. सुरक्षित अंतरावर जावे आणि वन्यप्राण्याला बाहेर पडण्यासाठी मार्ग द्यावा. वन्यप्राण्याला घेरणे, दगड मारणे, हाकलण्याचा प्रयत्न करणे किंवा गर्दी जमवणे यामुळे परिस्थिती अधिक धोकादायक होऊ शकते.
मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करताना वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी एफ. डी. सी. एम. तसेच वन विभागास सहकार्य करावे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी सारंग बोधे यांनी कळविले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






