चंद्रपूर तंबाखू प्रकरणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू वाहतूक करणारे जप्त वाहन

चंद्रपुरच्या MIDC मधील गोदाम सुगंधित तंबाखूचे माहेरघर? जप्ती, खंडणी आणि प्रत्यारोप; चंद्रपूर तंबाखू प्रकरणात नवा पेच

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 4, 2026

चंद्रपूर – चंद्रपूर तंबाखू प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. रामनगर पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू वाहतूक करणाऱ्या वाहनातून २० लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आहे. या प्रकरणात वाहन चालक समीर कुरेशी आणि मालक वसीम झिमरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दुसरीकडे, चालकाच्या तक्रारीवरून अरबाज शेख आणि ईरफान शेख यांच्याविरुद्ध कथित खंडणी प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांतील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरच्या पत्रकार परिषदेत संबंधित युवकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. (चंद्रपुरात नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक, जोरगेवार कुटुंबावर गुन्हा दाखल, वाचा बातमी)

चंद्रपूर तंबाखू प्रकरणाला नवे वळण

मात्र, या कारवाईला एक वेगळेच वळण मिळाले जेव्हा चालकाने दिलेल्या तक्रारीवरून हाच साठा पकडवून देण्याची धमकी देत अपहरण करून ३ लाखांची खंडणी व दरमहा ५० हजारांची मागणी करणाऱ्या अरबाज महबुब शेख आणि ईरफान शेख या दोघांविरोधातही रामनगर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. या सर्व नाट्यानंतर खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या या युवकांनी ३ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत पोलीस प्रशासन आणि सुगंधीत तंबाखू माफिया यांनी हातमिळवणी करून आपल्यावर खोटे व बोगस गुन्हे दाखल केल्याचा गंभीर दावा केला आहे. या प्रकरणात नेमके सत्य काय आहे आणि कोण खरे बोलत आहे, हे पोलीस तपासातूनच समोर येणार असले तरी या निमित्ताने शहरातील अवैध धंद्यांची पाळेमुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहेत.

एमआयडीसी गोदामातून तंबाखूची वाहतूक?

या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती पाहता, चालक कुरेशी याने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात धक्कादायक खुलासे केले आहेत. वसीम झिमरी याने एमआयडीसीस्थित गोदामात बोलावून तिथूनच सुगंधित तंबाखूच्या मालाची उचल करण्यास सांगितल्याची नोंद फिर्यादीत स्पष्ट आहे. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी याच गोदामावर मोठी धाड टाकली होती, जिथे मोठ्या प्रमाणावर मिश्रित तंबाखू तयार केला जात असल्याचे उघडकीस आले होते. असे असतानाही आज वसीम झिमरी इतक्या बेधडकपणे आपले अवैध साम्राज्य कसे चालवत आहे,

यामागे त्याला कोणते राजकीय पाठबळ लाभले आहे आणि वारंवार कायद्याच्या कचाट्यातून त्याला कोणी वाचवले, असे अनेक प्रश्न आता चंद्रपूरच्या वर्तुळात चर्चिले जात आहेत. एकेकाळी तत्कालीन पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी या तंबाखू माफियांना जेरीस आणले होते, परंतु कालांतराने परिस्थिती बदलल्यामुळे झिमरी पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व कॅन्सरसारख्या आजारांना आमंत्रण देणाऱ्या या घातक व्यवसायावर आताचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक काचोरे ठोस कारवाई करणार का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

दुसरीकडे, चंद्रपूर जिल्ह्यात जोमाने सुरू असलेल्या सुगंधीत तंबाखूच्या या काळ्या बाजाराकडे अन्न व औषध प्रशासन (FDA) जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त पद स्वीकारल्यानंतर राज्यभरात अशा अवैध व घातक व्यवसायांवर कठोर धडक कारवाईची मोहीम राबवली होती, परंतु चंद्रपुरातील यंत्रणा मात्र केवळ मुकदर्शकाची भूमिका घेत सुस्त बसल्याचे दिसते. प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळेच तंबाखू माफियांमधे कायद्याची भीती उरलेली नाही. एका बाजूला पोलिसांत परस्परांवविरोधात गुन्ह्यांची नोंद होत असताना आणि तंबाखू तस्करीचे धागेदोरे उघडकीस येत असताना, आता या प्रकरणात पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध विभाग काय कठोर पावले उचलतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment