रामनगर पोलीस डीजे कारवाईत जप्त केलेले डीजे वाहन आणि साऊंड सिस्टीम

चंद्रपुरात रात्री ११.३० वाजता डीजेचा दणदणाट; रामनगर पोलिसांची कारवाई

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 22, 2026

चंद्रपू : रामनगर पोलीस डीजे कारवाई करत चंद्रपुरात तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, विनापरवानगी आणि रात्री उशिरा डीजे वाजवला जात होता. ही घटना २१ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात घडली. ध्वनिमापकात आवाज ९३.३५ डेसिबल नोंदला गेला. पोलिसांनी डीजे वाहनासह ११ लाख ५ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (मूल पोलिसांनी जप्त केले ८५ लाखांचे साहित्य, डीजेच्या आवाजाची मर्यादा ओलांडली)

रामनगर पोलीस डीजे कारवाई : रात्री काय आढळले?

देवी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. विनापरवानगी, वेळेच्या नियमांचे उल्लंघन करून आणि निर्धारित मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या तीन जणांविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडक कारवाईदरम्यान पोलिसांनी डीजे साऊंड सिस्टीमसह तब्बल ११ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दिनांक २१ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळी रामनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार देवी उत्सवाच्या अनुषंगाने ध्वनिप्रदूषणाची मर्यादा तपासून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गस्त (पेट्रोलिंग) घालीत होते. दरम्यान, रात्री सुमारे साडेअकरा वाजता (२३:३० वाजता) आदर्श पेट्रोल पंपामागे, इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील कबरा इंजिनिअरिंगसमोर मोठ्या आवाजात डीजे वाजविला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पाहणी केली असता, वाहन क्रमांक MH-34-BZ-2827 वर लावलेल्या डीजे साऊंड सिस्टीममधून प्रचंड आवाजात संगीत सुरू असल्याचे आढळून आले.

ध्वनिमापकात ९३.३५ डेसिबल आवाज

घटनास्थळी ध्वनिमापक यंत्राद्वारे (Sound Level Meter) आवाजाची तीव्रता तपासली असता ती ९३.३५ डेसिबल एवढी निष्पन्न झाली, जी अनुमत मर्यादेपेक्षा अत्यंत जास्त होती. पोलिसांनी संबंधित डीजे चालक, मालक तसेच कार्यक्रमाच्या आयोजकांकडे डीजे वाजविण्याबाबतच्या वैध परवानगीबद्दल आणि वेळेच्या पालनाबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नसल्याचे समोर आले. तसेच त्यांनी रात्रीच्या विहित वेळेचे व ध्वनिप्रदूषणाचे स्पष्ट उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी सरकारी फिर्यादी सहायक पोलीस निरीक्षक सचिन राखुंडे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक १२०१/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३८ व १३६ अन्वयॆ गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात डीजे चालक/मालक अनिकेत अरविंद उईके (वय २३, रा. घंटा चौकी, ता. जि. चंद्रपूर), सर्वोदय शारदा महिला मंडळ, इंडस्ट्रियल इस्टेटच्या अध्यक्षा ममता बाबुराव कविकुलवार (वय ४२) आणि उपाध्यक्ष दुर्गा राजू गोटाकोंडे (वय ३५) यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

कारवाई दरम्यान पोलिसांनी न्यूमार्क कंपनीचा मिक्सर (४५,००० रुपये), एनएक्सऑडिओ ८०१ मशीन (५०,००० रुपये), टुरोइज उपकरण (२०,००० रुपये), एमटी ६० मशीन (५०,००० रुपये), एरोस कंपनीचे बॅक्स/बेस मशीन (२,४०,००० रुपये) आणि डीजेसाठी वापरलेले वाहन क्रमांक MH-34-BZ-2827 (७,००,००० रुपये) असा एकूण ११ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले व पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक सचिन राखुंडे, पोलीस उपनिरीक्षक भारत थिटे, पोलीस अंमलदार शंकर भोयर व योगेश्वर कोसरे यांनी पार पाडली. सण-उत्सवांच्या काळात ध्वनिप्रदूषणाचे नियम न पाळणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून अशीच कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment