चंद्रपूर: Chandrapur DJ Police Action: चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना डीजेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी कर्णकर्कश आवाजात सुरू असलेला डीजे आणि उच्च क्षमतेचे प्लाझ्मा लाईट्स तत्काळ ताब्यात घेतले. शासकीय नियमांचे थेट उल्लंघन केल्याप्रकरणी संशयितांवर रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूर रामनगर हद्दीत Chandrapur DJ Police Action ची मोठी मोहीम
शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शासकीय नियमांची पायमल्ली करत विनापरवाना उच्च क्षमतेचे प्लाझ्मा लाईट्स आणि कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उचलला आहे. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, डीजे साऊंड सिस्टीम, प्लाझ्मा लाईट्स व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ट्रॅक्टर-ट्रॉली असा एकूण १२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कठोर भूमिकेमुळे नियमबाह्य डीजे वाजविणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. (हे हि वाचा – दुर्गापूरात डीजे चा आवाज पोहोचला १२३ डेसिबल, पोलिसांची कारवाई)
विनापरवाना डीजे आणि प्लाझ्मा लाईट्सवर नेमकी कारवाई कशी झाली?
रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही इसमांकडून कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय, अतिउच्च क्षमतेचे प्लाझ्मा लाईट्स लावून व नियमांचे उल्लंघन करून कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात डीजे वाजविला जात असल्याची गुप्त व खात्रीशीर माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती. या प्रकारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण निर्माण होऊन सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचत होती. माहिती मिळताच पोलीस पथकाने विनाविलंब घटनास्थळी धाव घेत छापा टाकला असता, एका ट्रॅक्टर-ट्रॉलीवर डीजे साऊंड सिस्टीम आणि प्लाझ्मा साहित्य बसवून शासकीय नियमांची उघडपणे पायमल्ली करत मोठ्या आवाजात डीजे वाजविला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
ट्रॅक्टर आणि साऊंड सिस्टीमसह १२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी घटनास्थळावर उपस्थित असलेले ऑपरेटर आणि वाहनचालकाकडे डीजे साऊंड सिस्टीम व प्लाझ्मा वाजविण्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यांच्या अधिकृत परवानगीची विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय व शासनाने घालून दिलेल्या ध्वनीप्रदूषण नियंत्रण नियमांचे थेट उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित इसमांविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ७ लाख रुपये किमतीची ट्रॅक्टर व ट्रॉली तसेच ५ लाख ५० हजार रुपये किमतीची डीजे साऊंड सिस्टीम व उच्च क्षमतेचे प्लाझ्मा साहित्य असा मिळून एकूण १२ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
सदरची यशस्वी कामगिरी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकूरके यांच्या नेतृत्वात ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली आहे. दरम्यान, सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या, ध्वनीची विहित मर्यादा ओलांडून कर्णकर्कश आवाजात साऊंड सिस्टीम अथवा प्लाझ्मा वाजविणाऱ्या तसेच विनापरवाना डीजे संचालन करणाऱ्यांची गय केली जाणार नसून, त्यांच्यावर यापुढेही अशीच कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा चंद्रपूर पोलीस दलातर्फे देण्यात आला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






