चंद्रपूर वाहतूक पोलीस कारवाई दरम्यान बुलेट दुचाकीची तपासणी करताना पोलीस

चंद्रपुरात कर्णकर्कश सायलेन्सर बसवणाऱ्या १४ बुलेटस्वारांवर कारवाई

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 22, 2026

चंद्रपूर: चंद्रपूर वाहतूक पोलीस कारवाईत कर्णकर्कश सायलेन्सर बसवणाऱ्या १४ बुलेटस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहतूक नियंत्रण शाखेने २१ नोव्हेंबर २०२६ रोजी राबवलेल्या विशेष मोहिमेत त्यांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, एसटी बसस्थानक परिसरात बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्या १२ ऑटोचालकांवरही मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई झाली. नागरिकांच्या तक्रारींनंतर ही मोहीम राबवण्यात आली. (धुक्याने केला घात, कोरपण्यात भीषण अपघात दोघांचा मृत्यू, वाचा)

चंद्रपूर वाहतूक पोलीस कारवाई: मोहीम का राबवली?

शहरात कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवून स्टंटबाजी करणाऱ्या बुलेटस्वारांविरोधात तसेच एसटी बसस्थानक परिसरात बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्या ऑटोचालकांविरोधात वाहतूक नियंत्रण शाखेने धडक मोहीम राबवत कठोर कारवाई केली आहे. या विशेष मोहिमेत सायलेन्सरमध्ये फेरबदल करणाऱ्या १४ बुलेटस्वारांवर दंडात्मक कारवाई करत त्यांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले असून, नियम धाब्यावर बसवणाऱ्या १२ ऑटोचालकांवरही मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून काही बुलेटस्वार वाहनांच्या सायलेन्सरमध्ये अनधिकृत फेरबदल करून कर्णकर्कश आवाज काढत होते. गर्दीच्या ठिकाणी तसेच रहिवासी भागात अशा प्रकारे सायलेन्सरचे मोठे आवाज काढणे आणि स्टंटबाजी करणे यामुळे नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. याशिवाय, शहरातील एसटी बसस्थानक परिसरात ऑटोचालकांकडून बेशिस्तपणे वाहने चालवली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन प्रवासी व नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी ज्येष्ठ नागरिकांसह स्थानिकांकडून वारंवार प्राप्त होत होत्या.

कर्णकर्कश सायलेन्सर बुलेट: १४ चालकांवर दंडात्मक कारवाई, चंद्रपूर वाहतूक पोलीस कारवाई

या तक्रारींची गंभीर दखल घेत वाहतूक नियंत्रण शाखा, चंद्रपूरच्या वतीने २१ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष पथक तयार करून धडक मोहीम राबवण्यात आली. मोहिमेदरम्यान कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या आणि सायलेन्सरमध्ये फेरबदल केलेल्या एकूण १४ बुलेटस्वारांविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या (मोवाका) कलम १९८ आणि १९०(२) अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या बुलेटचे कर्णकर्कश सायलेन्सर जप्त केले असून, संबंधित वाहनचालकांना जागेवरच हे सायलेन्सर काढून पुन्हा कंपनी फिटेड सायलेन्सर बसवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर एसटी बसस्थानक परिसरात बेशिस्तपणे वाहतूक करणाऱ्या एकूण १२ ऑटोचालकांवर मोटार वाहन कायद्यातील विविध कलमान्वये कारवाईची नोंद करण्यात आली आहे.

वाहतूक शाखा, चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक अमोल बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली असून, यापुढेही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अशीच विशेष मोहीम सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शहरातील कायदा, सुव्यवस्था आणि वाहतुकीची शिस्त अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांनी व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन चंद्रपूर पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “चंद्रपुरात कर्णकर्कश सायलेन्सर बसवणाऱ्या १४ बुलेटस्वारांवर कारवाई”

Leave a Comment