चंद्रपूर – (Minor Driving Police Action) चंद्रपूर शहरात अल्पवयीन मुलांनी रस्ते वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहन चालवण्याचे प्रकार चिंताजनक पातळीवर वाढले आहेत. यामुळे गंभीर अपघात घडण्याची भीती निर्माण झाली होती. या समस्येची दखल घेत चंद्रपूरचे वाहतूक पोलीस निरीक्षक अमोल बारापात्रे यांनी शहरात सकाळी विशेष धडक मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी तब्बल ६५ अल्पवयीन वाहनचालकांना वाहन चालविताना पकडले व त्यांची सर्व वाहने जप्त केली आहेत. (ऊर्जानगर अल्पवयीन अत्याचार प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा)
शहरात अल्पवयीन मुलांनी नियम धाब्यावर बसवून वाहन चालवण्याचे प्रकार चिंताजनक पातळीवर वाढले आहेत. वाहतुकीच्या नियमांचे साधे ज्ञानही नसल्याने या मुलांमुळे भीषण अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. या गंभीर समस्येची दखल घेत चंद्रपूरचे वाहतूक पोलीस निरीक्षक अमोल बारापात्रे यांनी संपूर्ण शहरात सकाळी ७ ते ९ या वेळेत एक विशेष धडक मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान तब्बल ६५ अल्पवयीन वाहनचालकांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची सर्व वाहने जप्त करून थेट वाहतूक पोलीस कार्यालयात आणण्यात आली.
Minor Driving Police Action: ६५ अल्पवयीन चालक पकडले
या कारवाईनंतर पोलिसांनी एक नवा आणि कडक पवित्रा घेतला. ताब्यात घेतलेल्या मुलांच्या पालकांना सायंकाळी आपली वाहने परत नेण्यासाठी वाहतूक नियंत्रक कार्यालयात पाचारण करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षकांनी स्वतः सर्व पालकांशी संवाद साधत, अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देणे हे त्यांच्या आणि इतरांच्या जिवासाठी किती धोकादायक आहे, तसेच हा कायद्याने कसा गंभीर गुन्हा आहे, याची सविस्तर जाणीव करून दिली. ही पहिलीच कारवाई असल्याने आणि केवळ जनजागृती व्हावी या उद्देशाने, पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत सर्व अल्पवयीन चालकांकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा नाममात्र दंड वसूल करून वाहने सोडली.
मात्र, भविष्यात जर पुन्हा अशी चूक झाली, तर संबंधित पालकांवर थेट गुन्हा दाखल करून २५ हजार रुपयांचा मोठा दंड ठोठावला जाईल, असा स्पष्ट आणि कठोर इशारा पोलिसांनी दिला आहे. यापुढील कारवाईत कोणतीही दयामाया दाखवली जाणार नसल्याचेही प्रशासनाने ठणकावून सांगितले आहे.
दरम्यान, पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे शहरातील बेशिस्त पालक वर्गात एकच खळबळ उडाली असून, आता मुलांच्या हाती दुचाकी देताना पालक कमालीचे सावध झाले आहेत. मात्र, या संपूर्ण कारवाईच्या पार्श्वभूमीवर शहरात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. खरं तर, तब्बल २ वर्षांपूर्वीच वाहतूक पोलीस निरीक्षकांनी अल्पवयीन चालकांवर कठोर कारवाई करण्याचा आणि त्यांच्या पालकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यावेळी केवळ पोकळ घोषणाबाजी झाली आणि प्रत्यक्ष कारवाई शून्य राहिली.
आता तब्बल २ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि विलंबाने का होईना, पोलिसांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहिले आहे. त्यामुळे ‘अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना २ वर्षे का लागावीत?’ आणि ‘आज झालेली ही कारवाई अशीच पुढेही सातत्याने सुरू राहणार की काही दिवसांनी पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होणार?’ असा संतप्त सवाल चंद्रपूरकर उपस्थित करत आहेत. वाहतूक शाखेने मात्र रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक शिस्त लावण्यासाठी ही मोहीम यापुढेही सातत्याने राबवली जाईल, असा दावा केला आहे. आता पोलीस प्रशासनाचा हा दावा किती दिवस टिकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






