Tadoba Tiger Death Palasgaon Chandrapur

ताडोबात खळबळ; जेरबंद करताना वाघाचा मृत्यू

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 15, 2026

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून (Tadoba Tiger Death) एक अत्यंत धक्कादायक व दुर्दैवी बातमी समोर आली आहे. पळसगाव वनक्षेत्रातील लोकवस्तीच्या परिसरात वारंवार वावर करणाऱ्या एका प्रौढ वाघाचा आज बेशुद्ध करण्याच्या कारवाईदरम्यान अचानक मृत्यू झाला. काही दिवसांपासून हा वाघ मानवी वस्तीलगत फिरत असल्याने वन विभागाच्या जलद प्रतिसाद पथकाकडून (RRT) त्याच्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत होते. मात्र आज त्याला जेरबंद करत असताना दुपारी सुमारे ३.४५ ते ४.०० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. (गुराख्याला जबड्यात पकडत फरफटत नेले, धाडसी गुराखी अखेर वाचला)

Tadoba Tiger Death : पळसगाव वनक्षेत्रातील घटना

वन विभागाच्या माहितीनुसार, दिनांक २८ जून २०२६ रोजी चोरगाव परिसरात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात श्री. शिडामे यांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेस T-202F S2 हा प्रौढ वाघ कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ४ जुलै २०२६ रोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जलद प्रतिसाद पथकाने त्याला बेशुद्ध करून यशस्वीरित्या पकडले होते. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) मार्गदर्शक सूचनांनुसार त्याला ताडोबाच्या गाभा क्षेत्रात सोडण्यात आले होते.

मात्र, गाभा क्षेत्रात सोडल्यानंतरही या वाघाने जंगलातील नैसर्गिक भक्ष्याची शिकार केल्याची कोणतीही नोंद आढळून आली नाही. उलट तो पुन्हा पळसगाव वनक्षेत्रातील लोकवस्तीच्या परिसरात येऊन वावरू लागला. त्यामुळे मानवी जीवितास संभाव्य धोका निर्माण होऊ नये म्हणून वन विभागाने त्याच्या हालचालींवर मागील तीन दिवसांपासून सातत्याने लक्ष ठेवले होते.

आज त्याला आमिषाच्या साहाय्याने सुरक्षितरीत्या जेरबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या उपस्थितीत बेशुद्ध करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेदरम्यान संबंधित प्रौढ वाघाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

वन विभागाने वाघाचे शव ताब्यात घेतले असून नियमानुसार शवविच्छेदन करण्यात येणार आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असून त्याचा सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment