चिमूर वाघाचा हल्ला झालेल्या पळसगाव वनपरिक्षेत्रातील जंगलालगतचे शेत

चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; ३३ वा बळी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 16, 2026

चिमूर: चिमूर वाघाचा हल्ला या घटनेत एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील पळसगाव वनपरिक्षेत्रात शुक्रवारी, १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ही घटना घडली. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, महिला पतीसोबत शेतात काम करत होती. वाघाच्या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. वारसांना ५० हजारांची तात्काळ मदत देण्यात येणार आहे. (वाघाने हल्ला केला, इतर गुराखी मदतीला धावले, वाचा हि बातमी)

तालुक्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पळसगाव वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एक ४५ वर्षीय महिला जागीच ठार झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. शुक्रवारी (ता. १६) दुपारी पतीच्या डोळ्यादेखत हा थरार घडला. विशेष म्हणजे, या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, चालू वर्षातील मानव-वन्यजीव संघर्षातील हा तब्बल ३३ वा बळी ठरल्याने नागरिकांमध्ये संताप व भीतीचे वातावरण पसरले आहे. मानव वन्यजीव संघर्षातील हा ३३ वा बळी आहे.

चिमूर वाघाचा हल्ला: पळसगाव वनपरिक्षेत्रात घटना

प्राप्त माहितीनुसार, मृत महिला उषा अंकुश गुरुनुले (वय ४५, रा. पळसगाव परिसर) या आपले पती अंकुश गुरुनुले यांच्यासह धान पिकाला पाणी देण्यासाठी जंगलालगत असलेल्या आपल्या शेतात गेल्या होत्या. पती अंकुश हे डिझेल इंजिनजवळ पाण्याची व्यवस्था पाहण्यात व्यस्त होते, तर उषा या शेतात तण काढण्याचे काम करत होत्या. यादरम्यान शेतात दबा धरून बसलेल्या हिंस्र वाघाने अचानक त्यांच्यावर अत्यंत वेगाने झडप घातली. वाघाने महिलेला आपल्या जबड्यात पकडले आणि त्यांना फरफटत जंगलाच्या दिशेने ओढत नेले.

पत्नीवर अचानक झालेला हल्ला पाहून पतीने तातडीने आरडाओरड केली आणि धाव घेऊन त्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, वाघाने महिलेच्या मानेचा घातक चावा घेतल्यामुळे उषा यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. पळसगाव वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५५९, पीएफ १००० परिसरात ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरात शोककळा पसरली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बारसागडे, वनपाल चंद्रकांत रासेकर तसेच चिमूर पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. वनविभातर्फे घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्ट मॉर्टम) रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. प्रशासनाकडून तात्काळ मदत म्हणून मृताच्या वारसांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बारसागडे यांनी दिली आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

ताडोबा आणि बफर क्षेत्रालगतच्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचे हल्ले सातत्याने वाढले आहेत. दिवसागणिस वाढणाऱ्या अशा घटनांमुळे जंगलालगतच्या शेतात काम करताना शेतकरी व शेतमजुरांच्या जीवितावर सतत काच कुटत आहे. त्यामुळे वनविभागाने या परिसरात तातडीने गस्त वाढवावी आणि वन्यप्राण्यांच्या मानवी वस्तीतील वावरास व हल्ल्यांना आळा घालण्यासाठी तातडीने प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी संतप्त नागरिकांमधून केली जात आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment