चंद्रपूर: पळसगाव वाघ जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास टी-१७९ क्रमांकाचा वाघ पिंजऱ्यात अडकवण्यात आला. या वाघाने १६ ऑक्टोबर रोजी पळसगाव येथे एका महिलेवर हल्ला केला होता. त्यात त्या महिलेचा मृत्यू झाला, असे वनविभागाने सांगितले. दरम्यान, पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकूम येथे वाघाच्या हल्ल्यात ६० वर्षीय गुराखी गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत.
पळसगाव वाघ जेरबंद: टी-१७९ वाघ पिंजऱ्यात
चंद्रपूर जिल्ह्यात मानवी वस्ती आणि जंगल परिसराशेजारी वन्यप्राण्यांचे वाढते हल्ले आणि मानव-वन्यजीव संघर्षाची दाहकता दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. एका बाजूला चिमूर तालुक्यातील पळसगाव परिसरात दहशत निर्माण करून महिलेचा जीव घेणाऱ्या हल्लेखोर टी-१७९ (एसएम-१) वाघाला वनविभागाने शुक्रवारी (३० ऑक्टोबर) दुपारी यशस्वीरीत्या जेरबंद केले आहे, ज्यामुळे ग्रामस्थांनी मोठा सुटकेचा श्वास घेतला आहे. तर दुसरीकडे, पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकूम परिसरात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या एका ६० वर्षीय गुराख्यावर वाघाने अचानक जीवघेणा हल्ला केल्याची दुसरी थरारक घटना समोर आली आहे. (चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी २ शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू)
चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून टी-१७९ (एसएम-१) या वाघाने अक्षरशः दहशत माजवली होती. १६ ऑक्टोबर रोजी याच हल्लेखोर वाघाने पळसगाव येथील उषा अंकुश गुरनुले यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना जागीच ठार केले होते. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी आक्रमक होत तब्बल तीन तास रस्ता रोको आंदोलन केले होते. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने वनविभागाने वरिष्ठ पातळीवर तातडीने पाठपुरावा करून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडून वाघाला पकडण्याची कायदेशीर परवानगी मिळवली. त्यानुसार शुक्रवारी ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास पळसगाव बीट अंतर्गत येणाऱ्या गोंडमोहाळी कक्ष क्रमांक ५५८ मध्ये ही धडक कारवाई करण्यात आली.
क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ल, उपसंचालक विशाल माळी व सहाय्यक वनसंरक्षक साईतन्मय डुबे यांच्या मार्गदर्शनाखाली, पळसगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बारसागडे, क्षेत्र सहाय्यक सी. एन. रासेकर, वनरक्षक डी. बी. खार्डे, विक्रांत एन. दुधे आणि चंद्रपूर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या (टीटीसी) तज्ज्ञ पथकाने हा वाघ सुरक्षितरीत्या पिंजऱ्यात जेरबंद केला. जेरबंद केलेल्या या वाघाला पुढील वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी तातडीने चंद्रपूर येथील टीटीसी केंद्रात हलवण्यात आले आहे.
पोंभुर्णात सातारा तुकूम येथे गुराखी जखमी
एकीकडे पळसगावचा वाघ जेरबंद झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असतानाच, पोंभुर्णा तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्षाची आणखी एक भीषण घटना घडली आहे. पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकूम येथील राजेश्वर बिजा सिडाम (वय ६०) हे नेहमीप्रमाणे आपल्या गायी चारण्यासाठी जंगल परिसरात गेले होते. दरम्यान, सातारा तुकूम येथील वनकक्ष क्रमांक ४३६ मध्ये दबा धरून बसलेल्या हिंस्र वाघाने त्यांच्यावर अचानक झडप घालून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी राजेश्वर सिडाम यांना उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
एकाच दिवशी एका भागात जिथे दहशत निर्माण करणारा वाघ जेरबंद करण्यात यश आले आहे, तिथेच दुसरीकडे जंगलालगतच्या क्षेत्रात गुराख्यावर झालेल्या हल्ल्यामुळे शेतकरी, शेतमजूर व गुराख्यांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे. नागरिकांना जीव धोक्यात घालून जंगल व शेतात जावे लागत असल्याने, वनविभागाने अशा भागात गस्त वाढवून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






