वरोरा: वरोरा रस्ता रोको आंदोलनामुळे वणी-वरोरा बायपास मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. शुक्रवारी, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी गणपती मंदिर परिसरात हा प्रकार घडला. पोलिसांनी सांगितल्यानुसार, मार्गावर एक मातीचा हायवा ट्रक पलटी झाला होता. खड्ड्यांच्या निषेधार्थ मनसे पदाधिकारी रस्त्यावर बसले होते, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. विनापरवाना आंदोलन करून वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी वरोरा पोलिसांनी तीन पदाधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. (गडचांदूरात २३ वर्षीय विवाहिता बेपत्ता, वाचा बातमी)
वरोरा रस्ता रोको: वणी-वरोरा बायपासवर वाहतूक ठप्प
वणी-वरोरा बायपास मार्गावर मातीचा हायवा ट्रक पलटी झाल्यानंतर निर्माण झालेल्या दुरवस्थेमुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरच ठिया देत ‘रस्ता रोको’ आंदोलन केले. बेकायदेशीररीत्या वाहतूक रोखून धरल्याप्रकरणी वरोरा पोलिसांनी मनसेच्या शहर अध्यक्षांसह तीन प्रमुख पदाधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलमान्वय गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी (दि. १६ ऑक्टोबर २०२६) सकाळी वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपती मंदिर परिसरात हा प्रकार घडला.
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी वरोरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मनीषा तालेवार व त्यांचे पथक दिवसपाळीचे कर्तव्य बजावत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वणी-वरोरा बायपास रोडवरील गणपती मंदिरावळ एक मातीचा हायवा ट्रक (क्र. MH 29 BE 9086) पलटी झाला आहे. त्याच रोडवर रस्त्याची बिकट अवस्था आणि पडलेल्या खड्ड्यांचा निषेध नोंदवण्यासाठी मनसेचे पदाधिकारी रस्त्यावर बसून ठिया आंदोलन करत आहेत. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि सामान्य प्रवाशांना मोठ्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते.
पोलिसांची कारवाई आणि आंदोलकांचे म्हणणे
माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पाहणी केली असता, एम.एच. २९ बी.ई. ९०८६ क्रमांकाचा मातीचा हायवा ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झालेला होता आणि त्याच्या बाजूलाच मुख्य डांबरी रस्त्यावर मनसेचे पदाधिकारी बसून जोरदार घोषणाबाजी करत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी आपली ओळख आनंद वामनराव गेडाम (वय ३५, रा. मोकाशे लेआउट, वरोरा – मनसे शहर अध्यक्ष), प्रशांत जनार्धन झुंझारे (वय ४२, रा. मिलन चौक, वरोरा – मनसे तालुका अध्यक्ष) आणि प्रतीक प्रकाश मुळे (वय २२, रा. बावणे लेआउट, वरोरा – मनसे शहर उपाध्यक्ष) अशी सांगितली.
सदर मार्गावर पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे सतत अपघात होत असूनही संबंधित यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपण हे आंदोलन करत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांना हे आंदोलन बेकायदेशीर असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना व वाहनचालकांना नाहक त्रास होत असल्याचे समजावून सांगत रस्ता मोकळा करण्याची विनंती केली. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी बळाचा व कायदेशीर अधिकाराचा वापर करत पोलीस स्टाफच्या मदतीने आंदोलकांना रस्त्या बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत केली. तसेच हायवा ट्रकच्या सुपरवायझरला घटनास्थळावरून वाहन बाजूला करण्याचे निर्देश दिले.
या प्रकरणी सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना बेकायदेशीर रस्ता रोको आंदोलन करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनीषा तालेवार यांच्या फिर्यादीवरून वरोरा पोलीस ठाण्यात मनसेच्या तीनही पदाधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२६(२) अन्वय गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार नरेश कवडुजी नाननवरे करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






