सिंदेवाही: सिंदेवाही वाघ हल्ला प्रकरणात भेंडाळा येथे एका महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाला. प्रेमिला महाडोले (४०) शेतात तिळाचे पीक कापत असताना ही घटना घडली. वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार यांनी प्राथमिक माहितीनुसार हल्ल्याला दुजोरा दिला. दोन दिवसांत तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. २४ ऑक्टोबरला पळसगाव जाट येथे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. ग्रामस्थांनी वनविभागाकडे उपाययोजनांची मागणी केली आहे. (सिंदेवाहीत वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, वाचा बातमी)
सिंदेवाही वाघ हल्ला: दोन दिवसांत दुसरी घटना
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात वाघाचा मुक्काम आणि वन्यजीवांचे हल्ले सातत्याने सुरूच असून, एकापाठोपाठ एक घटनांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील भेंडाळा येथे वाघाच्या हल्ल्यात ४० वर्षीय महिला शेतकरी प्रेमिला पुंडलिक महाडोले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेतात काम करत असताना वाघाने केलेल्या या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा मृतदेहच शेतात आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आणि भीतीची लाट पसरली आहे. चालू वर्षात मानव वन्यजीव संघर्षात हा ३५ वा बळी आहे.
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती
सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) अंजली सायंकार यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रेमिला महाडोले या तिळाची पिके कापण्यासाठी आपल्या शेतात गेल्या होत्या, त्याच दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या सलग व दुर्दैवी घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये, शेतमजुरांमध्ये आणि पशुपालकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. आपल्याच मालकीच्या शेतात पोटाची खळगी भरण्यासाठी जाणे जिवावर बेतत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून, ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने कठोर उपाययोजना करण्याची आणि सुरक्षेची हमी देण्याची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या दोन दिवसांत सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांचे प्राण गेल्याने ग्रामीण भागात संतापाची व दहशतीची लाट उसळली आहे. २४ ऑक्टोबर रोजी सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव जाट येथे शेतात गेलेले शेतकरी नाना कांबडी यांना दबा धरून बसलेल्या वाघाने ठार केले होते, तर आज पुन्हा सिंदेवाही तालुक्यातच एका महिला शेतकऱ्याला वाघाने आपला बळी बनवले. या वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षावर नियंत्रण मिळवण्यात वनविभाग अपयशी ठरत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. शेतातील कामे कशी करावीत, असा प्रश्न शेतकरी वर्गासमोर उभा ठाकला असून, यावर वनविभागाने तातडीने ठोस पावले उचलून मानवी जीविताचे रक्षण करावे, अशी आक्रमक मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






