मुनगंटीवार मन की बात कार्यक्रमात चंद्रपूर येथे पुस्तक विमोचन करताना मान्यवर

चंद्रपुरात ‘मन की बात’ कार्यक्रम; मुनगंटीवार यांची जानेवारीत २५ हजार युवकांच्या संमेलनाची घोषणा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 25, 2026

चंद्रपूर : मुनगंटीवार मन की बात कार्यक्रमात चंद्रपूर येथे युवा संमेलनाची घोषणा करण्यात आली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहातील कार्यक्रमात ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ९ ते १२ जानेवारी २०२७ दरम्यान नवीन चंद्रपूर परिसरात संमेलन होणार आहे. १२ जानेवारीला सुमारे २५ हजार युवक एकत्र येतील. कार्यक्रमात ‘मन की बात’च्या १३८ भागांचा क्यूआर कोड असलेल्या पुस्तकाचे विमोचनही झाले. पोंभूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात आला. (चंद्रपुरात दोन आमदारांचे मन कि बात कार्यक्रम, वाचा बातमी)

मुनगंटीवार मन की बात कार्यक्रमात काय म्हणाले?

देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’मधून मिळालेली प्रेरणा माझ्यासाठी केवळ विचारांपुरती मर्यादित राहिली नसून, चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काहीतरी भरीव करण्याची ऊर्जा ठरली असल्याचे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे ‘मन की बात’च्या १२ वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ३ ऑक्टोबर २०१४ रोजी विजयादशमीच्या दिवशी सुरू झालेल्या या उपक्रमाच्या १३८ भागांचा क्यूआर कोड समाविष्ट असलेल्या विशेष पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. देशाच्या कानाकोपऱ्यातील सामान्य नागरिकांच्या असामान्य कार्यातून प्रेरणा घेत, त्या प्रेरणेचे समाजहिताच्या कृतीत रूपांतर करून विकसित भारताच्या निर्मितीत योगदान देणे हाच या उपक्रमाचा खरा संदेश असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

या कार्यक्रमाला पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, महापौर संगीता खांडेकर, सपनाताई मुनगंटीवार, जिल्हा संघचालक तुषारजी देवपुजारी, भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार अतुल देशकर, वासुदेव गाडेगोणे, गीताअनुवादक फातिमा बहन, पांडुरंग आंबटकर, किसनलाल चड्डा यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव, गायत्री परिवाराचे सदस्य, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात पुढे बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, सामान्य व्यक्तीने आपल्या कर्तृत्वातून समाजसमोर आदर्श निर्माण केल्यास अनेकांना प्रेरणा मिळते आणि याच विचारातून जिल्ह्यात सैनिकी शाळा, वन अकादमी, बोटॅनिकल गार्डन, अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण, स्मार्ट अभ्यासिका, वाचनालये, अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल, जलसंधारण तसेच कृषी विज्ञान केंद्रासारख्या विविध विकासकामांना चालना देता आली. विकास म्हणजे केवळ इमारती नव्हे, तर शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक प्रगतीच्या माध्यमातून नागरिकांचे जीवन समृद्ध करणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

९ ते १२ जानेवारीला नवीन चंद्रपुरात युवा संमेलन

समाजात परस्पर आदर, समजूतदारपणा आणि मानवतेची भावना दृढ होणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी गीताअनुवादक फातिमा बहन यांच्या कार्याचा गौरव केला. धर्म कोणताही असला तरी मानवतेचे कल्याण आणि परस्परांप्रती आदर हीच मूल्ये समाज जोडतात, असे ते म्हणाले. दरम्यान, येत्या ९ ते १२ जानेवारी २०२७ दरम्यान नवीन चंद्रपूर परिसरात भव्य युवा संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली. १२ जानेवारी रोजी सुमारे २५ हजार युवकांना एकत्र आणून साहित्य, उद्योग, शेती व संशोधनात त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी आणि चंद्रपूरची ओळख राष्ट्रीय स्तरावर उंचवावी, हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. मोबाइल्सचा वापर व्यसनासाठी नव्हे तर ज्ञान व कौशल्याचे साधन म्हणून करावा, असे आवाहन त्यांनी युवकांना केले.

महिलांचे शिक्षण, विद्यार्थिनींसाठी कौशल्य विकास केंद्रे, आधुनिक वैद्यकीय सुविधा, कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग आणि शेतकऱ्यांच्या सेंद्रिय उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘कृषी हाट’ व ‘फूड कोर्ट’ ही संकल्पना राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बल्लारपूर विधानसभेतील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा विशेष गौरव करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या १३ पुरस्कारांपैकी तब्बल ७ पुरस्कार पोंभूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे, ज्यांचे आ. मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरी या तीन तालुक्यांचा सुरुवातीला दुष्काळग्रस्त यादीत समावेश नसताना, शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून सर्व १५ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून घेतल्याबद्दल शेतकरी बांधवांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “चंद्रपुरात ‘मन की बात’ कार्यक्रम; मुनगंटीवार यांची जानेवारीत २५ हजार युवकांच्या संमेलनाची घोषणा”

Leave a Comment