चंद्रपूरमधील गायत्री महायज्ञाच्या भूमिपूजन सोहळ्याचे छायाचित्र.

सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते २५१ कुंडीय महायज्ञाचे भूमिपूजन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 29, 2026

चंद्रपूर, दि. २९ : गायत्री महायज्ञाचे भूमिपूजन चंद्रपूर येथील गायत्री शक्तिपीठ परिसरातील म्हाडा प्रांगणात रविवारी, २९ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. आमदार सुधीर मुनगंटीवार आणि सौ. सपना मुनगंटीवार यांच्या हस्ते विधिवत अनुष्ठान पार पडले. जानेवारी २०२७ मध्ये २५१ कुंडीय गायत्री महायज्ञ आणि व्यसनमुक्ती संकल्प समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. हा सोहळा ९ ते १२ जानेवारीदरम्यान होईल. (ध्वनी प्रदूषणाला कारणीभूत दुचाकीवर होणार कारवाई, पोलीस प्रश्नांची विशेष मोहीम)

चंद्रपूरमध्ये गायत्री महायज्ञाचे भूमिपूजन

वैदिक मंत्रोच्चार, भक्तिसंगीत आणि धार्मिक वातावरणात चंद्रपूर येथील गायत्री शक्तिपीठ परिसरातील म्हाडा प्रांगणात जानेवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्र जागरण, शौर्य समृद्धी २५१ कुंडीय गायत्री महायज्ञ व व्यसनमुक्ती संकल्प समारंभाचे रविवारी (२९ नोव्हेंबर) विधिवत भूमिपूजन करण्यात आले. हा सोहळा केवळ धार्मिक आयोजन नसून व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या वैचारिक शुद्धीकरणाचा संकल्प असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

मुख्य यजमान आमदार सुधीर मुनगंटीवार आणि सौ. सपना मुनगंटीवार यांच्या हस्ते वैदिक विधिविधानानुसार भूमिपूजनाचे अनुष्ठान पार पडले. देवतांचे आवाहन, गायत्री माता पूजन, गणेश-गौरी पूजन, स्वस्तिवाचन, रक्षा विधान आणि संकल्पविधी करण्यात आला. त्यानंतर ११ भगिनींनी कलशातून संपूर्ण परिसरात गंगाजल शिंपडून पावित्र्याचा संदेश दिला. उत्खनन यंत्रांचे पूजन करून प्रतीकात्मक उत्खनन करण्यात आले. अग्निस्थापना आणि निरांजन आरतीने सोहळ्याची सांगता झाली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी मांडलेल्या अमली पदार्थविरोधी भूमिकेचा उल्लेख करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यसनमुक्तीच्या संकल्पाशी त्याचा संबंध जोडला.

यज्ञातून सद्गुणी समाजनिर्मितीचा संदेश

यावेळी बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, यज्ञ हा केवळ धार्मिक विधी नसून राष्ट्र, समाज आणि कुटुंबातील संस्कारांचे जागरण करणारी प्रक्रिया आहे. सामूहिक सत्कर्मातून दुर्गुणांची आहुती देत सद्गुणी आणि आध्यात्मिक विचारांनी समृद्ध समाज घडविणे ही काळाची गरज आहे. येणाऱ्या संपूर्ण वर्षातही अशा दिव्य आयोजनांच्या माध्यमातून समाजजागृती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

सौ. सपना मुनगंटीवार यांनी या आयोजनातून संस्कारक्षम पिढी घडविण्याची अपेक्षा व्यक्त केली. समाजात प्रेम, करुणा, सेवा, समर्पण आणि सद्भावनेची ज्योत तेवत ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. शैलेंद्र शुक्ल यांनी आयोजनाची भूमिका स्पष्ट करताना प्रत्येक कार्यकर्त्याने या महायज्ञात आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले. सौ. सपनाताईंच्या माध्यमातून मातृशक्तीचे मोठे पाठबळ मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

युवक, महिला आणि व्यसनमुक्तीवर विशेष भर

आगामी ९ ते १२ जानेवारी २०२७ या कालावधीत हा महायज्ञ पार पडणार आहे. या आयोजनाला पूरक म्हणून निबंध व घोषवाक्य स्पर्धा, युवक संमेलन, गौमाता व गौउत्पादन प्रदर्शन आणि नारीशक्ती संमेलन असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आध्यात्मिक जागृतीसोबतच व्यसनमुक्ती, युवा प्रबोधन, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.

यावेळी शांतीकुंजचे योगेंद्र गिरीजी, गायत्री परिवाराचे योगीराज बल्कीजी, आशिष सिंह, म्हाडाचे कार्यकारी डॉ. विजय इंगोले यांच्यासह गायत्री परिवाराचे सदस्य, विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment