चंद्रपूर : चंद्रपूर सायलेन्सर मोहीम पोलिसांनी शहरासह जिल्ह्यातील ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सुरू केली आहे. ‘सायलेन्स चंद्रपूर’ या विशेष मोहिमेत अनधिकृत मॉडिफाईड सायलेन्सर लावणाऱ्या बुलेट आणि इतर दुचाकींवर कारवाई होणार आहे. (चंद्रपुरात टोळीयुद्ध, एकाचा मृत्यू, वाचा सविस्तर)
शहरासह जिल्ह्यातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच नागरिकांना शांततामय वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी ‘सायलेन्स चंद्रपूर’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत वाहनांना अनधिकृत मॉडिफाईड सायलेन्सर बसवून कर्कश तसेच फटाक्यांसारखा आवाज काढणाऱ्या बुलेट व इतर दुचाकी चालकांवर कठोर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
चंद्रपूर सायलेन्सर मोहीम; बुलेटवर कठोर कारवाई
अनधिकृत मॉडिफाईड सायलेन्सरमधून निघणाऱ्या तीव्र व कर्कश आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्णालयातील रुग्ण तसेच अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक शांतता भंग करणारी ही बाब गंभीर असून अशा वाहनचालकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
सर्व दुचाकी चालकांनी वाहन उत्पादक कंपनीने दिलेल्या अधिकृत सायलेन्सरचाच वापर करावा. वाहन चालविताना फटाक्यांसारखा आवाज काढू नये तसेच ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार जागेवरच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वाहनांना बसविण्यात आलेले अनधिकृत मॉडिफाईड सायलेन्सर जागेवरच काढून जप्त केले जाणार आहे. सार्वजनिक शांतता भंग व ध्वनी प्रदूषणप्रकरणी कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
तक्रारींसाठी व्हाट्सअप क्रमांक : ‘चला, चंद्रपूर शांत ठेवूया!’ या उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. आपल्या परिसरात अथवा रस्त्यावर कर्कश आवाज करणारे वाहन आढळल्यास संबंधित वाहनाचा क्रमांक स्पष्ट दिसेल, असा फोटो काढून चंद्रपूर पोलिसांच्या ९४०४११०४५६ या अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावा. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून संबंधित वाहनचालकावर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर यांनी कळविले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






