चंद्रपूर : Chandrapur Panand Rasta Yojana अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात ६०२० पाणंद रस्ते पूर्ण झाले आहेत. यामुळे शेतकरी बांधवांना शेतात जाणे-येणे अत्यंत सोपे झाले आहे. तसेच शेतीमालाची वाहतूक जलद व कमी खर्चात करणे शक्य झाले आहे. महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेच्या अभिसरणातून ही कामे पूर्ण झाली आहेत. सध्या जिल्ह्यात १३६७ रस्त्यांची कामे प्रगतीपथावर सुरू आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या अधिनस्त कार्यान्वय यंत्रणामार्फत सुरवातीच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 6351 पाणंद रस्त्याची कामे सुरू करण्यात आली. त्यापैकी 5276 पाणंद रस्ते सध्याच्या स्थितीमध्ये पूर्ण झालेली असून त्याचा वापर शेतकरी बांधव करत आहेत. नियोजन विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या मातोश्री पाणंद रस्ता योजनेच्या माध्यमातून 323 कामे जिल्ह्यात घेण्यात आली होती. त्यापैकी 237 कामे पूर्ण स्थितीमध्ये आहेत. (आरोग्याचे मॉडेल होणार बल्लारपूर विधानसभा)
Chandrapur Panand Rasta Yojana आणि विविध योजनांचे अभिसरण
जिल्हा खनिकर्म निधी, जिल्हा विकास योजना आणि मनरेगा या तिन्ही योजनांच्या अभिसरणातून चंद्रपूर जिल्ह्यात पालकमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजना राबवली जाते. या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात 195 पाणंद रस्त्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली होती. त्यापैकी सद्यस्थितीत 133 रस्ते पूर्ण झाले आहेत. राज्य शासनातर्फे मनरेगा योजनेतील अतिरिक्त कुशल घटकातून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 512 रस्त्यांची कामे घेण्यात आली होती. त्यापैकी 374 कामे पूर्ण झाली आहेत.
14 डिसेंबर 2025 रोजी ग्रामीण भागातील अंतर्गत दळणवळणाची साधने बळकट करण्यासाठी आणि शेतमालाचा बाजारपेठेतील पुरवठा सुलभ करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महसूल विभागातर्फे महत्त्वकांक्षी ‘मुख्यमंत्री शेतकरी बळीराजा पाणंद रस्ता योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये विधानसभास्तरीय समिती महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या समितीचे अध्यक्ष हे संबंधित विधानसभेचे सदस्य आणि सदस्य सचिव उपविभागीय अधिकारी आहेत. सदर समितीमध्ये भूमी अभिलेख, ग्रामविकास, वनविभाग, बांधकाम विभाग अशा सर्व विभागाच्या उपविभागस्तरीय प्रमुखांचे समन्वय घडवून विधानसभा स्तरावर पाणंद रस्त्यांच्या बांधकामांचे नियोजन केले जाते. या योजनेच्या माध्यमातून सध्याच्या स्थितीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 257 रस्ते करण्याचे आराखडे तयार झाले आहेत.
अशी आहे विधानसभानिहाय पाणंद रस्त्यांची आकडेवारी : राजुरा विधानसभा मतदारसंघात मनरेगा, मातोश्री, पालकमंत्री, अतिरिक्त कुशल आणि मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेंतर्गत आतापर्यंत 661 कामे पूर्ण तर 244 प्रगतीपथावर आहेत. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 114 कामे पूर्ण, 30 कामे प्रगतीपथावर, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 1062 कामे पूर्ण, 288 कामे प्रगतीपथावर, ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 1373 कामे पूर्ण, 343 कामे प्रगतीपथावर, चिमूर विधानसभा मतदारसंघात 2182 कामे पूर्ण, 412 कामे प्रगतीपथावर आणि वरोरा विधानसभा मतदारसंघात 228 कामे पूर्ण, 41 कामे प्रगतीपथावर आहेत.
शेतक-याचे मनोगत : पाणंद रस्त्याच्या सुविधेमुळे कसा लाभ झाला, याबाबत बोलतांना ब्रम्हपुरी तालुक्यातील झिलबोडी येथील शेतकरी राजेश नागतोडे म्हणाले, मातोश्री पाणंद रस्ता योजनेतून आमच्या गावाचा रस्ता बांधण्यात आला आहे. शेतात जाण्यासाठी पहिले खुप अडचण होत होती, धु-याने जावे लागत होते. शासनाने पाणंद रस्ता बांधून दिल्यामुळे आता खते, बियाणे, यंत्रसामुग्री थेट शेतापर्यंत पोहचविता येते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






