Chandrapur DJ Seized News दुर्गापूर पोलिसांनी जप्त केलेले डीजे साहित्य

चंद्रपुरातील दुर्गापूरात डीजेचा आवाज १२३ डेसिबलवर, पोलिसांनी थेट डीजे केला जप्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 14, 2026

चंद्रपूर / दुर्गापूर: Chandrapur DJ Seized News समोर आली असून दुर्गापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. उर्जानगर नेरी येथे गणेशोत्सवात कानठळ्या बसवणारा डीजे वाजवणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून वाहनासह १३ लाख ५० हजार रुपयांचे डीजे साहित्य जप्त केले. (हे हि वाचा – राजुरा शहरात विना परवाना डीजे लावणाऱ्यावर गुन्हा दाखल, डीजे जप्त)

Chandrapur DJ Seized News: उर्जानगर नेरी येथील कारवाई

गणेशोत्सवाच्या आगमनादरम्यान सर्वोच्च न्यायालय आणि जिल्हा प्रशासनाच्या ध्वनीमर्यादा आदेशांचे उल्लंघन करत कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात डीजे वाजवणाऱ्याविरुद्ध दुर्गापूर पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उचलला आहे. कोंडी वॉर्ड क्रमांक ६, उर्जानगर नेरी येथे विनापरवाना आणि क्षमतेपेक्षा अधिक कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी डीजे ऑपरेटरविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, घटनास्थळावरून महिंद्रा सुप्रो वाहनासह तब्बल १३ लाख ५० हजार रुपयांचे ध्वनिक्षेपक साहित्य जप्त करण्यात आले आहे. अमन गंगाधर गोहणे (रा. बाबराळा, ता. मूल, जि. चंद्रपूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डीजे चालकाचे नाव आहे.

पहिल्या तपासणीत १०५.५ डेसिबल आवाजाची नोंद

मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास दुर्गापूर पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, कोंडी वॉर्ड क्रमांक ६ उर्जानगर नेरी येथे गणेशोत्सव आगमन मिरवणुकीत डीजे अत्यंत तीव्र आवाजात सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक शेगावकर यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून ध्वनीमापक यंत्राद्वारे (साऊंड लेव्हल मीटर) आवाजाची तपासणी केली असता, आवाजाची तीव्रता तब्बल १०५.५ डेसिबल एवढी नोंदवली गेली. यावर पोलिसांनी पंचांसमक्ष संबंधित चालकाला नियमांचे पालन करण्याची कडक सूचना देत स्टेशन डायरीमध्ये रीतसर नोंद केली. मात्र, पोलिसांच्या या सूचनेकडे दुर्लक्ष करत संबंधित चालकाने पुन्हा काही वेळातच अत्यंत तीव्र व कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवण्यास सुरुवात केली.

पोलिसांच्या इशाऱ्यानंतरही १२३ डेसिबलने डीजे सुरूच

डीजेच्या आवाजाने नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याची खात्री पटताच पोलीस अंमलदार भोयर, पोलीस शिपाई हरीश तलांडे हे पंचांसह आणि ध्वनीमापक यंत्र घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या दुसऱ्या तपासणीत डीजेच्या आवाजाची मर्यादा तब्बल १२३.०५ डेसिबलपर्यंत पोहोचल्याचे उघडकीस आले, जे मानवी कानांसाठी अत्यंत घातक आणि विहित मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने जास्त होते. यावेळी पोलिसांनी चालकाकडे डीजे वाजवण्याच्या अधिकृत परवानगीबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे समोर आले. पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे थेट उल्लंघन झाल्याने पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पंचांसमक्ष जप्ती पंचनाम्याची कारवाई सुरू केली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी १ लाख रुपये किमतीचे शार्प ऑडिओ कंपनीचे मॉडेल नंबर एमटी-१२०१ अँप्लिफायर, साडेचार लाख रुपये किमतीचे दोन स्पीकर व एक टॉप, १ लाख रुपये किमतीचा डायनाटेक कंपनीचा डीजे मिक्सर, १ लाख रुपये किमतीचे १५ केव्ही जनरेटर व दोन पार्क लाईट यासह ६ लाख रुपये किमतीचे महिंद्रा सुप्रो वाहन (क्रमांक एमएच ३४ सी.क्यू. ३४९४) असा एकूण १३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस ठाण्यात जमा केला. याप्रकरणी आरोपी अमन गोहणे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ सहकलम १३६ आणि ७० महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शेगावकर, पोलीस उपनिरीक्षक पंकज वासाडे, पोलीस हवालदार भोयर आणि पोलीस शिपाई तलांडे यांनी केली. दरम्यान, आगामी सण-उत्सवांच्या काळात विनापरवाना डीजे वाजवून अथवा आवाजाची मर्यादा ओळखून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर यापुढेही अशाच प्रकारची कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment