Rajura Police DJ Action विनापरवाना साऊंड सिस्टीम आणि जप्त वाहन

विनापरवाना डीजे वाजवणाऱ्यांचे धाबे दणाणले; राजुऱ्यात १२ लाखांचा डीजे थेट जप्त; गुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 14, 2026

राजुरा: Rajura Police DJ Action संदर्भात मोठी कारवाई समोर आली आहे. राजुरा पोलिसांनी विनापरवाना साऊंड सिस्टीम लावणाऱ्यांवर थेट धडक कारवाई केली. नवीन बस स्टॉपसमोरून १२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी बल्लारपूर येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि लक्ष्मण लोकरे यांच्या गुन्हे शोध पथकाने ही धडक कामगिरी पार पाडली. (हे हि वाचा – देवघरातील चावी काढत घरफोडी, पावणे दोन लाखांचे सोने लंपास)

Rajura Police DJ Action : नवीन बस स्टॉपसमोरील धडक कारवाई

शासकीय आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना डीजे व साऊंड सिस्टीम लावणाऱ्यांविरुद्ध राजुरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राजुरा येथील नवीन बस स्टॉपसमोर एका वाहनावर बेकायदेशीररीत्या डीजे सुरू असल्याची गोपनीय माहिती राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. MH-34-BZ-5017 वर डीजे वाजवण्याची तयारी सुरू असल्याचे निदर्शनास आले.

तपासणीदरम्यान विनापरवाना डीजे वाजवणे उघडकीस

पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित वाहनचालक आणि मालकाकडे डीजे अथवा वाद्य वाजवण्याबाबतच्या अधिकृत शासकीय परवान्याची विचारणा केली, मात्र त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मोठ्या आवाजात डीजे साऊंड सिस्टीम लावून ध्वनीप्रदूषण करणे तसेच शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत डीजे साहित्य आणि वाहन जप्त केले. याप्रकरणी डीजे मालक व ऑपरेटर रवी सतीश एकनकर (वय २८ वर्षे, रा. फुलसिंग नाईक वार्ड, बल्लारशा) आणि वाहनचालक सचिन इन्चुलाल सरोज (वय २२ वर्षे, रा. पंडित दीनदयाल वार्ड, बल्लारशा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे राजुरा येथे अप. क्र. ७३०/२०२६ अन्वये कलम २२३ भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ सहकलम ३८, १३६ महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे १२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ८ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी (क्र. MH-34-BZ-5017), १ लाख रुपये किमतीचे डायनॉटीक कंपनीचे २ साऊंड टॉप, २ लाख रुपयांचे क्रीश कंपनीचे ४ साऊंड बेस, ४० हजार रुपयांची क्राउन कंपनीची १ मशीन, २० हजार रुपयांचा कॉईनर कंपनीचा १ मिक्सर आणि १ लाख रुपये किमतीचा किर्लोस्कर कंपनीचा १ जनरेटर अशा साहित्याचा समावेश आहे.

सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत गुन्हे शोध पथकाचे सपोनि लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, अनुप डांगे, पोलीस अंमलदार शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी आणि राजीव दुबे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या आणि विनापरवाना डीजे वाजवून ध्वनीप्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा सक्त इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment