राजुरा : राजुरा घरफोडी अटक प्रकरणात पोलिसांनी एका १४ वर्षीय बालकाला ताब्यात घेतले आहे. सास्ती येथील रहिवासी ईलाज शेख नमाज पठणासाठी गेले असताना अज्ञात चोराने घरात प्रवेश करून १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे काही तासांतच संशयित बालकाला ताब्यात घेतले. विचारपुशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली, त्यानंतर पोलिसांनी चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. (चंद्रपूरचा राजा गणेश मंडळावर गुन्हा दाखल, वाचा हि बातमी)
राजुरा घरफोडी अटक प्रकरण नेमकं कसं उघडकीस आलं?
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सास्ती येथील रहिवासी ईलाज सुलतान शेख (वय ५६ वर्षे) हे २५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १:०० ते २:०० वाजेच्या सुमारास आपले घर बंद करून जामा मशीद, राजुरा येथे नमाज पठणासाठी गेले होते. या काळात घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोराने घरात प्रवेश केला आणि बेडरूममधील लोखंडी अलमारीचे दरवाजे उघडून लॉकरमध्ये ठेवलेले १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. नमाज पठण करून ईलाज शेख घरी परतले असता अलमारीचे दरवाजे उघडे दिसल्याने संशय आला. त्यांनी तातडीने पत्नीला बोलावून दागिन्यांची पाहणी केली असता, लॉकरमधील सोन्याचे झुमके (७ ग्रॅम), सोन्याची रिंग (२ ग्रॅम), सोन्याची अंगठी (३ ग्रॅम), ‘786’ चे लॉकेट असलेली सोन्याची साखळी (५ ग्रॅम), कानातील सोन्याचे झुमके (२ ग्रॅम) आणि सोन्याची नथ-बेसर (१.५ ग्रॅम) असा एकूण १ लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज गायब असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पीडित ईलाज शेख यांच्या तोंडी तक्रारीवरून राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात करण्यात आली.
पोलिसांची तत्पर कारवाई आणि मुद्देमाल जप्ती
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून Rajura Police ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे व त्यांच्या गुन्हे शोध पथकाने (DB Team) परिसरात तात्काळ शोधमोहीम राबवली. तपासादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सास्ती येथील एका १४ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकाला संशयावरून ताब्यात घेतले. पोलिसांच्या पथकाने त्याला विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता, त्याने या चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेला १ लाख रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदर यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि राजुराचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात सपोनि लक्ष्मण लोकरे, सहाय्यक फौजदार किशोर तुमराम, पोलीस हवालदार विक्की निर्वाण, अनुप डांगे, पोलीस अंमलदार शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी आणि राजीव दुबे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






