सोन्याचे दागिने चोरी प्रकरणात रुई येथील बंद घराच्या दरवाजाचे प्रातिनिधिक छायाचित्र

भरदिवसा बंद घर फोडून १.३५ लाखांचा ऐवज लंपास, ब्रम्हपुरी पोलिसांत गुन्हा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 30, 2026

चंद्रपूर: ब्रम्हपुरी तालुक्यातील रुई येथे सोन्याचे दागिने चोरी प्रकरणात अज्ञात चोराने बंद घराचे कुलूप तोडून १ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १२:३० या वेळेत घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चोरीला गेलेल्या ऐवजात १ लाख १५ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि २० हजारांची रोकड आहे. ब्रम्हपुरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (शेळीवरून वाद, एकावर प्राणघातक हल्ला, वाचा हि बातमी)

सोन्याचे दागिने चोरी : रुई येथे २९ सप्टेंबरला नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुई येथील रहिवासी आणि शेती व्यवसाय करणारे सुरेश गणपत बुल्ले (वय ६०) हे आपली पत्नी उत्तरा (वय ५५), मुलगी चिनेश्वरी प्रधान (वय २५) आणि ५ वर्षांचा नातू डेव्हिड यांच्यासह राहतात. २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी उत्तरा व मुलगी चिनेश्वरी या दोघी शेतावर काम करण्यासाठी निघून गेल्या होत्या, तर नातू डेव्हिड कॉन्व्हेंटमध्ये गेला होता. त्यानंतर सकाळी ११ वाजताच्या सुमारास सुरेश बुल्ले हे घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून चाबी नेहमीच्या जागेवर ठेवून गावातील बसस्टॉपवरील आपल्या चहा-खर्याच्या दुकानात गेले होते.

दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी व मुलगी शेतावरून घरी परतल्या असता त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप खाली पडलेले दिसून आले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास सुरेश बुल्ले घरी परतल्यावर त्यांच्या पत्नीने कुलूप लावण्याबाबत विचारणा केली. त्यांनी कुलूप लावूनच गेल्याचे स्पष्ट केल्यावर खाली पडलेले कुलूप पाहिले असता ते तुटलेल्या अवस्थेत आढळले. संशय आल्याने सर्वांनी घरात जाऊन पाहणी केली असता लोखंडी आलमारीचा दरवाजा उघडा होता आणि बाहेरील तसेच आतील लहान लॉकरचे लॉक तोडलेले दिसून आले.

कपाटातील लॉकर फोडून दागिने आणि रोकड लंपास

लॉकरमध्ये ठेवलेली २० हजार रुपयांची रोख रक्कम आणि १ लाख १५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने गायब झाले होते. चोरीला गेलेल्या ऐवजात ५० हजार रुपये किमतीचा १० ग्रॅम सोन्याचा गोफ, २५ हजार रुपयांची ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, २० हजार रुपये किमतीच्या ४.५ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या नथ, १० हजार रुपये किमतीच्या ३ ग्रॅमच्या कानातील बिन्ऱ्यांचा एक जोड आणि १० हजार रुपये किमतीचे ५ तोळ्यांचे चांदीचे चाळ (एक जोड) अशा एकूण १ लाख १५ हजार रुपयांच्या दागिन्यांसह २० हजार रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे.

कोणीतरी अज्ञात चोराने घर ओस असल्याचे पाहून मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि आलमारीतील रोखड व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी सुरेश बुल्ले यांच्या तोंडी तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५(a) आणि ३३१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मिलिंद नैताम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment