चंद्रपूर: उसेगाव शेळी वाद हल्ला प्रकरणात सावली तालुक्यात एक ५५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. शेळी शेजाऱ्यांच्या घराकडे गेल्याच्या कारणावरून वाद झाला, असे तक्रारीत म्हटले आहे. जखमीवर गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सावली पोलिसांनी दोन भावांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. (डेटिंग ऐप वर तरुणाने ११ लाख गमावले, वाचा हि बातमी)
उसेगाव शेळी वाद हल्ला : २८ सप्टेंबरच्या संध्याकाळी नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, उसेगाव येथील रहिवासी आणि मजुरी काम करणारे शालीक डोनुजी घोनमोडे (वय ५५) हे २८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास आपल्या पाच शेळ्या चारून घरी परत आले होते. ते आपल्या शेळ्या नेहमीप्रमाणे घरासमोर बांधत असताना, त्यांच्या घराजवळच राहणारा दिनेश गोविंदा गेडाम (वय ३५) हा तेथे आला आणि ‘तुझी शेळी नेहमी माझ्या घरी का येते?’ असे म्हणत शालीक यांना अश्लील शिवीगाळ करू लागला. यावर शालीक यांनी ‘मी शेळी बांधत आहे, तू विनाकारण शिव्या का देतोस?’ अशी विचारणा केली. या क्षुल्लक कारणावरून संतापलेला दिनेश गेडाम आणि त्याचा भाऊ दीपक गोविंदा गेडाम हे दोघेही रस्त्यावर आले आणि त्यांनी शालीक यांना जोरदार शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
बैलगाडीच्या दांडीने मारहाणीचा तक्रारीत उल्लेख
वाद विकोपाला गेल्यानंतर दिनेश गेडाम याने रस्त्यावर उभ्या असलेल्या बैलगाडीची लाकडी उभारी काढली आणि थेट शालीक यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. त्याच वेळी त्याचा भाऊ दीपक गेडाम हादेखील दुसरी उभारी घेऊन मारहाण करण्यासाठी धावून आला. या प्राणघातक हल्ल्यात शालीक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते रक्तबंबाळ झाले आणि चक्कर येऊन खाली कोसळले. घडलेला प्रकार पाहून शालीक यांची पत्नी आणि मोठ्या भावाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दीपक गेडाम हा धमक्या देत असतानाच त्यांनी त्याला कसेबसे रोखले आणि रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या शालीक यांना तातडीने सावली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला, जिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
रुग्णालयात उपचार घेत असताना शालीक घोनमोडे यांनी दिलेल्या बयाणावरून सावली पोलिसांनी २९ सप्टेंबर रोजी पहाटे ३:२५ वाजता आरोपी दिनेश गोविंदा गेडाम आणि दीपक गोविंदा गेडाम या दोघा भावांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २९६, ३(५), ३५१(२) आणि ११८(१) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक प्रदिप पुल्लारवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरशेन बीके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






