चंद्रपूर: हळदा घरफोडी प्रकरणात अज्ञात चोराने बंद घराचे कुलूप तोडून १ लाख रुपयांची रोकड लांबवली. ही घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथे २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २:२५ या वेळेत घडली. ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शेतमाल विकून आलेली रक्कम कपाटातील लॉकरमध्ये ठेवली होती, असे तक्रारीत म्हटले आहे. (झाडीत लपविलेल्या कार मध्ये लाखोंचा तंबाखू, वाचा हि बातमी)
हळदा घरफोडी : भरदिवसा नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हळदा येथील रहिवासी आणि ज्ञानगंगा विद्यालयात प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत असलेले वामन मोतीराम कोटगले (वय ५६) हे नेहमीप्रमाणे शाळेत गेले होते. त्यांची पत्नी मालता (वय ४६) आणि मुलगा प्रतीक (वय २१) हे दोघेही कामानिमित्त ब्रम्हपुरी येथे गेले होते. कोटगले यांनी सकाळी १० वाजताच्या सुमारास घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावले आणि चाबी ठरलेल्या जागी ठेवून ते शाळेत निघून गेले.
दुपारी २ वाजेच्या सुमारास शाळेला जेवणाची सुट्टी झाल्यानंतर कोटगले चहा पिऊन दुपारी २:२५ वाजताच्या सुमारास पाणी पिण्यासाठी घरी परतले. त्यावेळी त्यांना घराच्या मुख्य दरवाजाला लावलेला दांडा दिसून आला. संशय आल्याने त्यांनी आत जाऊन पाहिले असता हॉलमधील सोफ्यावर कुलूप ठेवलेले आढळले. त्यानंतर त्यांनी बेडरूममध्ये जाऊन पाहणी केली असता लोखंडी आलमारीचा दरवाजा उघडा होता आणि आतील लॉकरचे कुलूप तोडलेले दिसून आले.
कपाटातील लॉकर फोडून एक लाखाची रोकड लंपास
कोटगले यांनी शेतमाल विकून आलेली १ लाख रुपयांची रोकड आलमारीच्या लॉकरमध्ये ठेवली होती. या पैशांतून ते आपल्या मुलाला लॅपटॉप घेऊन देणार होते. मात्र चोराने आलमारीतील ती संपूर्ण रोकड लांबवल्याचे समोर आले. घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोराने संधी साधत ही घरफोडी केली.
या प्रकरणी वामन कोटगले यांच्या तोंडी तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध बीएनएस (BNS) संहिता २०२३ च्या कलम ३०५(a) आणि ३३१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रेखालाल गौतम करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






