राजुरा हुक्का तंबाखू जप्त कारवाईत पोलिसांनी ताब्यात घेतलेली स्विफ्ट डिझायर कार

राजुरा हुक्का तंबाखू जप्त : झाडीत लपवलेल्या कारमधून ९.८१ लाखांचा साठा हस्तगत

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 30, 2026

राजुरा (चंद्रपूर) : राजुरा हुक्का तंबाखू जप्त प्रकरणात पोलिसांनी कापनगाव शिवारातील काटेरी झुडपात लपवलेली स्विफ्ट डिझायर कार ताब्यात घेतली. या कारमधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि हुक्का शिशाचा साठा सापडला. वाहनासह एकूण ९ लाख ८१ हजार ४० रुपयांचा माल हस्तगत झाला आहे. कारवाई २८ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे ४ वाजता झाली. कारचा चालक आणि मालक पसार झाला असून राजुरा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (डेटिंग ऐप वर तरुणाला ११ लाखांचा गंडा, वाचा बातमी)

राजुरा हुक्का तंबाखू जप्त : कापनगावजवळ रात्री नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा पोलीस ठाण्याच्या प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक प्रविना प्रकाश पडोळे या पोलीस हवालदार विनोद, पोलीस अंमलदार शफीक व महिला पोलीस शिपायांसह २७ सप्टेंबरच्या रात्री गस्तीवर असताना २८ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ च्या सुमारास कापनगावजवळ महामार्गाच्या कडेला काटेरी झाडीत संशयास्पद स्थितीत उभी असलेली स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक MH 47 AB 9884) आढळून आली. पोलिसांनी जवळ जाऊन पाहिले असता गाडीत किंवा आसपास कुणीही आढळून आले नाही. गाडीतून तीव्र सुगंधित तंबाखूचा वास येत असल्याने पोलिसांनी स्थानिक पंचांना पाचारण करून वाहनाची पाहणी केली.

कारमध्ये काय सापडले आणि किती रकमेचा माल जप्त?

वाहनाच्या मध्यल्या व समोरील सीटवर पांढऱ्या व पिवळ्या रंगाच्या एकूण १५ प्लॅस्टिक चुंगड्यांमध्ये मानवी आरोग्यास अपायकारक आणि शासनाने बंदी घातलेला सुगंधित तंबाखू आणि हुक्का शिशाचा साठा मिळून आला. या जप्तीमध्ये २ लाख ८१ हजार ४० रुपये किमतीचा ‘ईगल’, ‘होला’ आणि ‘मजा १०८’ ब्रँडचा हुक्का शिशा तंबाखू साठा आणि वाहतुकीसाठी वापरलेली ७ लाख रुपये किमतीची सिफ्ट डिझायर गाडी, असा एकूण ९ लाख ८१ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी यांच्याशी संपर्क साधून कायदेशीर प्रक्रिया पार पाडत ई-साक्ष अ‍ॅपद्वारे संपूर्ण जप्तीचे चित्रीकरण केले आणि मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक प्रविना पडोळे यांच्या तक्रारीवरून राजुरा पोलीस ठाण्यात फरार चालक व मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम २७४, २७५ सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नितीनकुमार चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण सुभाष लोकरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment