चंद्रपूर : चंद्रपूर ऑनलाईन फसवणूक प्रकरणात एका तरुणाला तब्बल ११ लाख ७० हजार ९५७ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. सोशल मीडियावरील डेटिंग अॅपवर झालेल्या ओळखीनंतर ऑनलाईन टास्कच्या नावाखाली ही फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदाराने चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. (बंद घरी चोरी, ७० हजारांचा ऐवज लंपास, वाचा बातमी)
चंद्रपूर ऑनलाईन फसवणूक : डेटिंग अॅपवर ओळख ते ११ लाखांचा गंडा
मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर येथील संत तुकाराम हॉलजवळ राहणारे व मूळचे बिहार येथील रहिवासी असलेले ३३ वर्षीय सुमन कुमार राम बिलास प्रसाद हे सहाय्यक लोको पायलट म्हणून कार्यरत आहेत. ‘ट्रुली मॅडली’ (Truly Madly) या सोशल मीडिया डेटिंग अॅपवर १६ जून २०२६ रोजी त्यांची ‘रिया कपूर’ नावाच्या मुलीशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री वाढली आणि व्हॉट्सअॅप व टेलिग्रामवरून त्यांच्यात नियमित संभाषण सुरू झाले.
ऑनलाईन टास्कच्या नावाखाली २७ टप्प्यांत गुंतवणूक
काही दिवसांनंतर, २६ जून रोजी रियाने सुमन कुमार यांना ‘www.esellerstorebuy.xyz’ या साईटवर अकाउंट (ID) तयार करून प्रॉडक्ट खरेदी-विक्रीचे काम करण्याचा सल्ला दिला. यामध्ये सेलरकडून ऑर्डर पूर्ण करण्यासाठी पैसे गुंतवावे लागतील आणि ऑर्डर कस्टमरला डिलिव्हर झाल्यावर नफ्यासह सर्व रक्कम वॉलेटमध्ये परत येईल, असे आमिष दाखवण्यात आले. तिच्या सांगण्यावरून सुमन कुमार यांनी यूजर आयडी तयार करून २६ जून ते २४ जुलै २०२६ या कालावधीत विविध यूपीआय (UPI) आणि बँक खात्यांद्वारे २७ टप्प्यांत एकूण ११ लाख ७० हजार ९५७ रुपये गुंतवले.
काही दिवसांनी जेव्हा सुमन कुमार यांनी कमावलेला नफा आणि गुंतवलेली मुद्दल काढण्याचा (Withdrawal) प्रयत्न केला, तेव्हा रियाने खाते कायमचे बंद करण्यासाठी अतिरिक्त १,७९९ डॉलरची मागणी केली. सुमन कुमार यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवत गुंतवलेली रक्कम परत मागितली असता, तिने नफ्याची रक्कम भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित करण्यासाठी १,६५५.८३ डॉलर किंवा बायनन्स खात्यातून पैसे काढण्यासाठी ४९९ डॉलर भरण्यास सांगितले. सतत पैशांची मागणी होत असल्याचे पाहून सुमन कुमार यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी अधिक पैसे देण्यास नकार दिला असता संशयित आरोपी रियाने त्यांच्याशी व्हॉट्सअॅप व टेलिग्रामवरून संपर्क तोडला.
आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुमन कुमार यांनी चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० च्या कलम ६६ (क), ६६ (ड) सह भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३१८(४), ३१९(२), ३०८ आणि ३(५) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुनील विठ्ठलराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गिरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






