चंद्रपूर: शेअर मार्केट फसवणूक चंद्रपूर येथे उघडकीस आली आहे. जास्त परताव्याचे आमिष दाखवून ५३ वर्षीय कर्मचाऱ्याची ९ लाख ९० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फेसबुक जाहिरात आणि व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे आरोपींनी तक्रारदाराला जाळ्यात ओढल्याचे पोलिसांनी सांगितले. ३० ऑगस्ट ते २२ सप्टेंबर २०२६ या काळात ११ व्यवहारांद्वारे ही रक्कम आरोपींनी दिलेल्या खात्यांमध्ये पाठवण्यात आली. (आर्थिक व्यवहारातून लोखंडी सालाखीने युवकाला मारहाण, वाचा हि बातमी)
शेअर मार्केट फसवणूक चंद्रपूर : फेसबुक जाहिरातीपासून सुरुवात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपुरातील भिवापूर वार्ड, जुना बियाणी चौक परिसर (आरसीईआरटी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ) येथील रहिवासी केशव रामदास पिंपळकर (वय ५३) हे वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (WCL) लालपेठ येथे फोरमन म्हणून कार्यरत आहेत. त्यांना शेअर मार्केटबाबत थोडी माहिती असल्याने त्यांनी यापूर्वी ‘ग्रो’ (Groww) अॅपच्या माध्यमातून काही गुंतवणूक केली होती.
दरम्यान, २० ऑगस्ट २०२६ रोजी सोशल मीडियावर फेसबुकवर सर्फिंग करत असताना त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची जाहिरात दिसली. जाहिरातीवर दिलेल्या लिंकवरून त्यांना ‘sig Susquehanna’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडण्यात आले, ज्यामध्ये ११८ सदस्य आधीपासूनच होते. त्यानंतर शिखा शर्मा, प्रोफेसर जिग्नेश वोरा आणि अॅडमिन नाव असलेल्या अज्ञात व्यक्तींनी व्हॉट्सअॅप मेसेज आणि ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून पिंपळकर यांना भारतातील अर्थव्यवस्थेबाबत माहिती देऊन गुंतवणूक करण्यास प्रेरित केले. ग्रुपमधील इतर सदस्यांना मोठा फायदा होत असल्याचे पाहून पिंपळकर यांनीही पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या सांगण्यावरून पिंपळकर यांनी ‘Niftypwm’ नावाचे अॅप डाऊनलोड केले. सुरवातीला ३० ऑगस्ट रोजी त्यांनी १०,००० रुपये भरले असता, अॅपवर त्यांना १,१०० रुपयांचा फायदा दाखवण्यात आला. त्यानंतर आरोपींच्या जाळ्यात अडकून त्यांनी ३० ऑगस्ट ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आपल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावरून एकूण ११ विविध व्यवहारांद्वारे ९ लाख ९० हजार रुपये आरोपींनी दिलेल्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले.
७९ लाखांचा नफा दाखवून २३ लाखांच्या कर्जाची मागणी
पिंपळकर यांनी गुंतवलेल्या ९.९० लाख रुपयांवर अॅपमध्ये तब्बल ७९ लाख ५९ हजार ४७० रुपयांचा नफा दाखवण्यात आला. मात्र, जेव्हा त्यांनी ही रक्कम आणि मूळ मुद्दल काढण्याचा (विड्रॉल) प्रयत्न केला, तेव्हा अॅपवर पैसे काढता येत नसल्याचे स्पष्ट झाले. उलटपक्षी, अॅपवर २३ लाख ५२९ रुपये थकीत कर्ज (Outstanding Debt Amount) दाखवून ते कर्ज फेडल्याशिवाय शेअर्स विकता येणार नाहीत आणि पैसे विड्रॉल करता येणार नाहीत, असा मेसेज त्यांना आला. शिखा शर्मा हिच्याशी व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला असता तिने थकीत कर्जाची रक्कम भरण्यासाठी तगादा लावला आणि मुदत वाढवून कर्ज काढण्याचा सल्ला दिला.
आपली ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच केशव पिंपळकर यांनी सायबर क्राईम पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवली. त्यानंतर १ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांनी चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष उपस्थित राहून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६(सी), ६६(डी) सह भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३(५), ३०८, ३१८(४) आणि ३१९(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे आणि पोलीस निरीक्षक सुनील विठ्ठलराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






