Chandrapur Digital Arrest Scam प्रकरणी चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवताना पीडित

चंद्रपुरात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ६३ लाखांची लूट

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 16, 2026

चंद्रपूर: Chandrapur Digital Arrest Scam प्रकरणात एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला तब्बल ६३ लाख रुपयांना गंडवण्यात आले आहे. WCL मधून निवृत्त झालेल्या ६७ वर्षीय दिनकर खोब्रागडे यांना बनावट पोलीस अधिकारी व ईडीची धमकी देत लुटले. सर्वोच्च न्यायालयाची खोटी नोटीस आणि अटकेची भीती दाखवून त्यांची फसवणूक झाली. चंद्रपूर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे. (हे हि वाचा – सिंदेवाहीमध्ये बंद घरात चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील सदस्यांना अटक)

Chandrapur Digital Arrest Scam: नेमके प्रकरण काय आहे

देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘डिजिटल अरेस्ट’च्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या सायबर भामट्यांनी आता चंद्रपुरातही मोठा डल्ला मारला आहे. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडमधून (WCL) सेवानिवृत्त झालेल्या एका ६७ वर्षीय कर्मचाऱ्याला बनावट पोलीस अधिकारी, सर्वोच्च न्यायालयाची नोटीस आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कारवाईची भीती दाखवून तब्बल ६३ लाख ७ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

बनावट पोलीस अधिकाऱ्याचा व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल कसा आला

पोलिसांनी दिलेल्या प्रथम खबर अहवालानुसार, दुर्गापूर येथील ऊर्जानगर परिसरातील मेजर गेटजवळ राहणारे दिनकर गोविंदराव खोब्रागडे (वय ६७) हे डब्ल्यूसीएलमधून वरिष्ठ मेकॅनिक पदावरून सेवानिवृत्त झाले असून ते पत्नीसह वास्तव्यास आहेत. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी खोब्रागडे यांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने आपण मुंबई पोलीस दलातील अधिकारी असल्याचे भासवून खोब्रागडे यांच्या नावावर नवीन सिमकार्ड काढण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या गणवेशातील एका व्यक्तीने त्यांना व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला. खोब्रागडे यांच्या ओळखपत्राचा वापर करून मुंबईतील कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आले असून त्यावर आंतरराष्ट्रीय फंड आल्याचे सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर देशविघातक कृत्यांना पाठबळ देणारा संशयित आरोपी मोहम्मद सलीम याला अटक करण्यात आली असून, त्याने खोब्रागडे यांच्या खात्यात आलेल्या पैशांपैकी १० टक्के रक्कम खोब्रागडे यांना दिल्याची खोटी कहाणी रचण्यात आली.

सर्वोच्च न्यायालय व ईडीच्या खोट्या नोटीसने कशी दहशत निर्माण केली

या प्रकरणात खोब्रागडे यांच्यावर तात्काळ अटकेची कारवाई होणार असल्याचे सांगत त्यांना कोणाशीही चर्चा न करण्याची ताकीद देण्यात आली. वाच्यता केल्यास मुलगा व कुटुंबीयांनाही अटक करू, अशी थेट धमकी देण्यात आली. विश्वास बसावा यासाठी सायबर भामट्यांनी मुंबई क्राईम ब्रँचची खोटी तक्रार प्रत, कॅनरा बँकेचे बनावट स्टेटमेंट आणि सर्वोच्च न्यायालयाची खोटी नोटीस व्हॉट्सॲपवर पाठवली. दुसऱ्या दिवशी ईडीच्या (ED) बनावट नोटीसची प्रत पाठवून कारवाई टाळण्यासाठी पैशांची मोठी मागणी सुरू केली. तीव्र दहशतीखाली आलेल्या खोब्रागडे यांनी स्वतःचा व कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी आयुष्यभराची पुंजी आणि सेवानिवृत्तीनंतर बँक ऑफ इंडियाच्या पद्मापूर शाखेत ठेवलेल्या मुदत ठेवी (FD) मोडून आरोपींनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर १ ते ३ डिसेंबर २०२५ दरम्यान तब्बल ६३ लाख ७ हजार रुपये आरटीजीएसद्वारे वर्ग केले. पैसे उकळल्यानंतर भामट्यांनी ईडीचे समन्स रद्द झाल्याचे बनावट पत्र पाठवून तक्रारदाराची दिशाभूल केली.

घटनेनंतर प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याने वृद्ध दाम्पत्याने बराच काळ ही बाब कोणालाही सांगितली नाही. दरम्यान, सप्टेंबर २०२६ मध्ये हे दाम्पत्य पाषाण (पुणे) येथे मुलाकडे गेले असता, ७ सप्टेंबर रोजी भामट्यांनी पुन्हा जम्मूतील बँकेत खाते उघडून पैसे घेतल्याचा नवा आरोप करत धमकावणे सुरू केले. मात्र, यावेळी त्यांच्या सुनेला आणि मुलाला या कॉल्सबाबत तीव्र संशय आल्याने त्यांनी वडिलांचा मोबाईल तत्काळ बंद करून संपूर्ण हकिगत जाणून घेतली आणि ६३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. मुलाने तात्काळ नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवली.

यानंतर चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहून दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८(४), ३१९(२), ३०८, ३३६, २०५, ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(क) व ६६(ड) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक सुनील विठ्ठलराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर सायबर पोलीस या आंतरराज्यीय रॅकेटचा कसून तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment