सावली, चंद्रपूर : Sawali Tiger Attack प्रकरणात एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. निलसनी पेठगाव येथे गुरे राखत असलेल्या ६८ वर्षीय वासुदेव वाकुडकर यांच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला केला. बुधवारी दुपारी १.३० वाजता ही घटना घडली. जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्षातील हा तिसावा बळी ठरला आहे. घटनास्थळ शाळेजवळ असल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे. (हे हि वाचा – गुराख्याची वाघासोबत झुंज, वाघाला काठीने पळवून लावले)
तालुक्यातील निलसनी पेठगाव येथे गावालगत गुरे राखत असलेल्या ६८ वर्षीय वृद्धावर पट्टेदार वाघाने हल्ला करून त्यांना ठार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी सुमारे १.३० वाजता घडली. वासुदेव लक्ष्मण वाकुडकर असे मृत वृद्धाचे नाव असून, जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्षातील हा तिसावा बळी ठरला आहे.
Sawali Tiger Attack: निलसनी पेठगावात नेमके काय घडले
मिळालेल्या माहितीनुसार, वाकुडकर हे गावालगतच्या झुडपी जंगलाशेजारी नेहमीप्रमाणे गुरे राखत होते. यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात वाकुडकर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
ही घटना संरक्षित वन कक्ष क्रमांक १५१२ मध्ये घडली आहे. वृत्त समजताच चंद्रपूर चे सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे आणि सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
गेल्या महिनाभरापासून या परिसरात वाघाचा वावर असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र वारंवार सूचना देऊनही ठोस उपाययोजना न झाल्याने अखेर या वाघाने एका निष्पाप जीवाचा बळी घेतल्याची भावना गावकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
विशेष चिंतेची बाब म्हणजे, घटनास्थळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे. शाळेची संरक्षण भिंतही मोडकळीस आलेली असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पालकवर्गात तीव्र चिंता निर्माण झाली आहे. वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, तसेच शाळा व गाव परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाकडून पुढील कार्यवाही काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






