Savli Tiger Attack incident at Samda forest range near Nagoba Devasthan

सावलीत वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार मृत्यू; अब तक २६

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 1, 2026

News34 सावली: Savli Tiger Attack मुळे सावली वनपरिक्षेत्रातील सामदा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सामदा नियतक्षेत्रातील नागोबा देवस्थानाजवळ वाघाने गुराख्यावर अचानक भीषण हल्ला केला. या हल्ल्यात हिरामण मार्कंडी साखरे या ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे संपूर्ण सावली परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे सावट पसरले आहे. माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (हे हि वाचा – वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी)

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सामदा येथील रहिवासी असलेले हिरामण साखरे हे नेहमीप्रमाणे आपले भाऊ श्रावण साखरे यांच्यासमवेत सामदा मार्गावरील नागोबा देवस्थान परिसरातील जंगलात गुरे चारण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास अचानक वाघाच्या डरकाळीचा भीषण आवाज ऐकू आला. धोका ओळखून हिरामण यांनी आपली गुरे सुरक्षित ठिकाणी वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या हिंस्त्र वाघाने त्यांच्यावर झडप घेतली. या भीषण हल्ल्यात हिरामण यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सावली वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला व तो उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना केला. तसेच, परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सावली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता.

चालू वर्षातील मानव-वन्यजीव संघर्षातील २६ वा बळी

विशेष म्हणजे, चालू वर्षात या भागातील मानव-वन्यजीव संघर्षातील हा तब्बल २६ वा बळी ठरला असून यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. अवघ्या तीन आठवड्यांपूर्वीच याच नागोबा देवस्थान परिसरात टस्कर हत्तीच्या हल्ल्यात अतुल गोहणे या तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच आता वाघाच्या हल्ल्यात वृद्धाचा बळी गेल्याने सावली वनपरिक्षेत्रात दिवसेंदिवस वाढणाऱ्या मानव-वन्यजीव संघर्षावर नियंत्रण मिळवण्यात वनविभाग पूर्णपणे अपयशी ठरत असल्याची तीव्र व संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

सध्या शेतीचा मुख्य हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे करणे भाग आहे. मात्र, हिंस्त्र श्वापदांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी व शेतमजूर प्राणांच्या भीतीने शेतात जाण्यास धजावत नाहीत. मजुरांची भासणारी तीव्र टंचाई आणि वन्यजीवांची सतत असलेली दहशत यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. या जंगल परिसरात हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता वनविभागाने तात्काळ व ठोस उपाययोजना करून नागरिकांच्या जीविताचे रक्षण करावे, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment